पेट्रोल पंप रविवारी बंद राहणार?

वृत्तसंस्था
सोमवार, 10 एप्रिल 2017

इंडियन ऑईलने प्रसिद्ध केलेल्या परिपत्राकानुसार, पेट्रोल पंप व्यावसायिकांना पेट्रोलच्या प्रतिलीटर विक्रीवर 2.56 रुपये, तर डिझेलच्या प्रतिलीटर विक्रीवर 1.65 रुपये कमिशन दिले जाते. पेट्रोल पंप व्यावसायिकांनी पेट्रोलच्या प्रतिलीटर विक्रीवर 3.33 रुपये तर डिझेलच्या प्रतिलीटर विक्रीवर 2.13 कमिशन देण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली - कन्सोरटियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्स अर्थातच सीआयपीडी येत्या 10 मे पासून दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 

कमिशन वाढवून देण्याबाबत सरकारकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या पेट्रोल पंप चालक आठवड्यातील सातही दिवस पेट्रोल पंप सुरू ठेवतात. मात्र आता सरकारकडून कमिशन वाढवून दिले जात नसल्याने दर रविवारी साप्ताहिक सुट्टी घेण्याचा पवित्रा देशभरातील पेट्रोल पंप मालकांनी घेतला आहे.

इंडियन ऑईलने प्रसिद्ध केलेल्या परिपत्राकानुसार, पेट्रोल पंप व्यावसायिकांना पेट्रोलच्या प्रतिलीटर विक्रीवर 2.56 रुपये, तर डिझेलच्या प्रतिलीटर विक्रीवर 1.65 रुपये कमिशन दिले जाते. पेट्रोल पंप व्यावसायिकांनी पेट्रोलच्या प्रतिलीटर विक्रीवर 3.33 रुपये तर डिझेलच्या प्रतिलीटर विक्रीवर 2.13 कमिशन देण्याची मागणी केली आहे.

बर्‍याच दिवसांपासून पेट्रोल पंप चालकांकडून कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे. जानेवारीमध्ये देखील पेट्रोल पंप मालक अशी मागणी करत संपावर गेले होते. त्यानंतर मात्र मोदी सरकारने कमिशन वाढवून देण्याबद्दलचे आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला. मात्र सरकारकडून आणि तेल कंपन्यांकडून आश्वासन पूर्ण करण्यात आले नाही.

पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवी शिंदे म्हणाले की, ''सरकारकडून कमिशनमध्ये वाढ न झाल्यास 10 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलची खरेदी केली जाणार नाही. शिवाय 14 मे रोजी रविवार असल्याने पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांना सुट्टी देऊन त्यानंतरच्या प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येतील. तसेच 15 मे पासून पेट्रोल पंप फक्त सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेतच सुरु असतील.''

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबई आणि चालू वर्षात मार्चमध्ये दिल्लीमध्ये सीआयपीडी आणि पेट्रोल कंपन्यांबरोबर झालेल्या बैठकीत कमिशनबाबत तोगडा निघाला नाही. त्यामुळे आता 10 मे नंतरच्या प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सीआयपीडी स्पष्ट केले आहे. सीआयपीडीच्या या निर्णयामुळे देशभरातील 53 हजार पेट्रोल पंप बंद राहण्याची शक्यता आहे.

(अर्थ विषयक घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा www.sakalmoney.com)

Web Title: Petrol Pump Owners Threaten to Remain Closed on Sundays