एसआयपी, एसटीपी, एसडब्लूपी: गुंतवणुकीचे परिपूर्ण नियोजन!

-डॉ. वीरेंद्र ताटके
सोमवार, 19 डिसेंबर 2016

शाळेतील गणिताचे शिक्षक सांगायचे, की कोणतेही अवघड गणित समीकरणाच्या स्वरूपात मांडावे म्हणजे समजायला सोपे जाते.

शाळेतील गणिताचे शिक्षक सांगायचे, की कोणतेही अवघड गणित समीकरणाच्या स्वरूपात मांडावे म्हणजे समजायला सोपे जाते.

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचेदेखील थोडे तसेच आहे. "एसआयपी', "एसटीपी', "एसडब्लूपी' या संज्ञा नव्या गुंतवणूकदाराला अनोळखी वाटल्या तरी त्या क्रमाने समीकरणात मांडल्या की समजण्यास सोप्या जातात. म्युच्युअल फंडातील "एसआयपी' (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन), "एसटीपी' (सिस्टेमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन) आणि "एसडब्लूपी' (सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लॅन) या पर्यायांचा दिलेल्या क्रमाने आणि योग्य कालावधीत उपयोग केल्यास आपल्या गुंतवणुकीचे परिपूर्ण नियोजन होते. या तिन्ही पर्यायांचा आपण पुढील क्रमाने उपयोग करू शकतो.

1) एसआयपी- विसावं वरीस मोक्‍याचं:
साधारणतः विसाव्या वर्षापासून आपल्या हातात थोडेफार पैसे येऊ लागतात. त्यामधून छोट्या रकमेची एसआयपी सुरू करावी. या पर्यायातून बॅंकेतील आपल्या बचत खात्यावरून अतिशय शिस्तबद्ध व नियमितपणे दरमहा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते. हा गुंतवणूक प्रकार आपण कधीही सुरू करू शकत असलो तरी कमी वयात गुंतवणुकीस सुरवात करावी. साधारणतः वयाच्या विसाव्या वर्षी ही गुंतवणूक छोट्या रकमेपासून सुरू करून हळूहळू दरमहा रक्कम वाढविल्यास मोठी रक्कम जमा होण्यास मदत होते. "एसआयपी' करताना शक्‍यतो डायव्हर्सिफाइड फंडात करावी, असा सल्ला दिला जातो; परंतु कमी वयात "एसआयपी' सुरू केल्यास सेक्‍टोरल किंवा थिमॅटिक फंडासारख्या जोखीमयुक्त फंडातदेखील थोडी गुंतवणूक करून संधीचा फायदा करून घ्यायला हरकत नसावी. विसाव्या वर्षात सुरू केलेली एसआयपी चाळिसाव्या वर्षापर्यंत नियमितपणे सुरू ठेवावी. या कालावधीत फंडांची सतत अदलाबदल करणे, "एसआयपी' बंद करणे, एकाच प्रकारचे अनेक फंड घेणे, फंडांची संख्या प्रमाणाबाहेर वाढवणे यांसारख्या चुका टाळाव्यात. वीस वर्षे सातत्याने गुंतवणूक केल्याने अर्थव्यवस्थेतील आणि शेअर बाजारातील अनेक आवर्तने आपण पूर्ण करतो, ज्याचा फायदा आपल्या गुंतवणुकीवर दिसतो. यानंतर साधारणतः चाळिसाव्या वर्षी पुढील पाऊल उचलावे.

2) एसटीपी- पुढचं पाऊल:
वीस वर्षे नियमितपणे "एसआयपी'द्वारे गुंतवणूक केल्यानंतर पुढचं पाऊल "एसटीपी'च्या (सिस्टेमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन) रूपाने उचलावे. या पर्यायातून एका म्युच्युअल फंडातील रक्कम हळूहळू दुसऱ्या फंडात ट्रान्स्फर केली जाते. वयाची वीस ते चाळीस वर्षे "एसआयपी'मधून जमा झालेली रक्कम पुढील वीस वर्षांत जोखीमयुक्त फंडामधून सुरक्षित किंवा कमी जोखीमयुक्त फंडामध्ये ट्रान्स्फर करत राहावे. शक्‍यतो अशी ट्रान्स्फर इक्विटी (डायव्हर्सिफाइड, सेक्‍टोरल, थिमॅटिक) फंडातून बॅलन्स्ड फंडात केल्यास जोखीम कमी होत जाते. अशी "एसटीपी' वय वर्षे चाळीस ते साठ सुरू ठेवावी. यानंतर "एसडब्लूपी'च्या मदतीने परत फिरण्याचा विचार करावा.

3) एसडब्लूपी- परत फिरा:
एसडब्लूपी (सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लॅन) या पर्यायात एखाद्या म्युच्युअल फंडात गुंतविलेली रक्कम हळूहळू गुंतवणूकदाराच्या बचत खात्यावर ट्रान्स्फर केली जाते. थोडक्‍यात, "एसआयपी'मध्ये बचत खात्यातून म्युच्युअल फंड असा असलेला प्रवास "एसडब्लूपी'मध्ये म्युच्युअल फंडामधून बचत खाते असा उलट दिशेने होतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे वय वर्षे चाळीस ते साठ या कालावधीत "एसटीपी' केल्यानंतर साठाव्या वर्षापासून दरमहा "एसडब्लूपी' सुरू ठेवावा. अशा "एसडब्लूपी'ची दरमहा रक्कम अशा पद्धतीने ठरवावी, की एकूण रक्कम साधारणतः पुढील वीस वर्षे पुरेशी पडेल.

अशा प्रकारे नियोजन करताना पुढील मुद्दे लक्षात येतात.
1) वाढत्या वयाबरोबर गुंतवणुकीतील जोखीम कमी करावी, हा मूलभूत नियम पाळला जातो. शिवाय "एसटीपी'द्वारे आपल्या निवृत्तिवेतनाची तरतूददेखील होते.
2) वर नमूद केलेले गुंतवणूक पर्याय दिलेल्या क्रमानुसार आणि दीर्घ कालावधीसाठी वापरणे आवश्‍यक आहे; अन्यथा त्याचे पूर्ण फायदे मिळण्याची शक्‍यता कमी होऊ शकते; तसेच उदाहरणासाठी प्रत्येक गुंतवणूक पर्याय वीस वर्षांसाठी सुचविलेला आहे. गुंतवणूकदाराच्या आर्थिक स्थितीनुसार तो कमी-जास्त होऊ शकतो.
3) वरील उदाहरणात "एसटीपी' आणि "एसडब्लूपी' सुरू असताना "एसआयपी' गुंतवणूक बंद झाली आहे, असे मानले आहे; पण ज्यांना शक्‍य असेल, त्यांनी वीस वर्षांनंतरही "एसआयपी' सुरू ठेवल्यास त्याचे अधिक फायदे नक्कीच मिळतील.
4) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वरील उदाहरणात दिल्याप्रमाणे गुंतवणूक केल्यास शेअर बाजाराचे अजिबात ज्ञान नसलेली कोणतीही व्यक्ती वय वर्षे वीस ते वय वर्षे ऐंशी अशा साठ वर्षांच्या मोठ्या कालावधीत आपली गुंतवणूक शेअर बाजारात कमी-जास्त प्रमाणात करत राहाते. शिवाय अशी गुंतवणूक करण्याचा खर्चदेखील अत्यल्प आहे.
आता लक्षात आले, अवघड गणित सोपे करण्यासाठी समीकरणाच्या स्वरूपात मांडावे, असे गणिताचे शिक्षक का सांगायचे! तेव्हा नव्या वर्षात गुंतवणुकीच्या नियोजनाचा असा संकल्प करायचा विचार आताच सुरू केला पाहिजे आणि त्यानुसार प्रत्यक्ष कृती केली पाहिजे.

(डिस्क्‍लेमर: शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणूक प्रकारांत जोखीम असते, ही बाब लक्षात घेऊन म्युच्युअल फंडांच्या विविध प्रकारच्या योजनांची सविस्तर माहिती घेऊन तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने गुंतवणूक करणे श्रेयस्कर ठरते.)

Web Title: Planning of investment in Mutual Funds