
नव्याने आलेल्या "कोरोना कवच' पॉलिसीविषयी अनेकांमध्ये संभ्रम दिसून येत आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर "मेडिक्लेम' पॉलिसी आणि "कोरोना कवच' यातील नेमका फरक समजून घेऊया.
कोविड-19 च्या उपचारादरम्यान येणाऱ्या खर्चासाठी आर्थिक संरक्षण मिळावे या हेतूने सादर करण्यात आलेल्या "कोरोना कवच' विमा योजनेला सध्या मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, त्याच वेळेस नेहमीची आरोग्य विमा (मेडिक्लेम) पॉलिसी असताना, नव्याने आलेल्या "कोरोना कवच' पॉलिसीविषयी अनेकांमध्ये संभ्रम दिसून येत आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर "मेडिक्लेम' पॉलिसी आणि "कोरोना कवच' यातील नेमका फरक समजून घेऊया. तसेच पॉलिसी घेताना ती "इंडिव्हिज्युअल' घ्यावी, की "फॅमिली फ्लोटर' याविषयी जाणून घेऊया.
"मेडिक्लेम' अर्थात नेहमीची आरोग्य विमा योजना
- इतर आजारांबरोबरच "कोविड-19' हा श्वसनाशी संबंधित आजार म्हणून "कोरोना'च्या उपचारादरम्यान येणाऱ्या खर्चाला देखील संरक्षण प्रदान केले जाते. मात्र, मेडिक्लेम पॉलिसींअंतर्गत डिस्पोजेबल/कंझ्युमेबल वस्तुंचा "क्लेम' दिला जात नाही. त्यामुळे कोविड-19 च्या उपचारादरम्यान लागणाऱ्या पीपीई किट, ग्लोव्हज, मास्क या डिस्पोजेबल वस्तुंचा "क्लेम' मिळत नाही. परिणामी, मेडिक्लेम पोलिसी असून देखील पॉलिसीधारकांना स्वतःच्या खिशातून बिल भरावे लागते.
- अनेक कंपन्यांच्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये रूम रेंट किंवा आयसीयू चार्जेससाठी कॅपिंग (मर्यादा) असते. त्यामुळे पॉलिसीत नमूद केल्यानुसार हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्यास अतिरिक्त चार्जेस भरावे लागू शकतात.
- शहरांनुसार (झोन) प्रीमियम रकमेत फरक पडतो.
- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, कोविड-19 च्या उपचारादरम्यान "कोमॉंरबॅडीटी' संबंधित (डायबेटीस, हायपरटेन्शन, हृदयाशी संबंधित आजार किंवा श्वसनाचे इतर आजार) आजार उद्भवले आणि या आजारांचा मेडिक्लेम पॉलिसींमध्ये समावेश नसल्यास अतिरिक्त पैसे भरावे लागतात.
"कोरोना कवच' काय आहे?
- संपूर्णपणे कोविड-19 साठी लागणारे उपचार लक्षात घेऊन पॉलिसी तयार करण्यात आली आहे.
- कोविडसंबंधित कराव्या लागणाऱ्या कोणत्याही (आयुर्वेद ते मॉडर्न मेडिसिन) उपचार पद्धतीचा समावेश.
- पीपीई किट, ग्लोव्हज, मास्क, सॅनिटाईझ केलेल्या वस्तू यांसारख्या वस्तूंचा खर्च समाविष्ट.
- काही कंपन्यांमध्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय "कोमॉंरबॅडीटी' आजारांचा समावेश, तर काहींमध्ये अतिरिक्त प्रीमियम भरून या आजारांसंबंधी देखील तजवीज करता येणार. (फक्त कोविड उपचारांदरम्यान हे आजार आढळून येऊन त्यावर उपचार करण्याची वेळ आल्यास).
- चौदा दिवसांच्या "होम ट्रीटमेंट'दरम्यान येणाऱ्या डॉक्टर (कन्सल्टेशन), नर्सिंग, ऑक्सिजन सिलिंडर, नेब्युलायझर, औषधांचा खर्च मिळणार.
- आरोग्य क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय, ग्रामीण भागातील रहिवासी, महिला यांसाठी पॉलिसींमध्ये विविध प्रकारचे डिस्काउंट.
"इंडिव्हिज्युअल' की फॅमिली फ्लोटर?
कोरोनाचे (संसर्गजन्य) स्वरूप पाहता आणि उपचारादरम्यान येणारा खर्च लक्षात घेता, अशी पॉलिसी घेताना "फॅमिली फ्लोटर' ऐवजी "इंडिव्हिज्युअल' (वैयक्तिक) पर्याय निवडणे कधीही उत्तम. कारण, "फॅमिली फ्लोटर'चा पर्याय निवडल्यास वैयक्तिकसाठी येणाऱ्या प्रीमियमच्या तुलनेत फक्त 5 टक्क्यांच्या प्रीमियम रकमेचा फरक पडतो. मात्र, वैयक्तिकमध्ये प्रत्येकाला स्वतंत्रपणे निवडलेल्या खर्चाचे संरक्षण मिळू शकते, तर "फ्लोटर' योजनेत संपूर्ण कुटुंबांमध्ये मिळून ती रक्कम वापरली जाते.
सोबतच्या तक्त्यावरून हा फरक लक्षात येईल.
खालील उदाहरणात 40 वर्षांखालील कुटुंबासाठी (पती-पत्नी, मुलगा आणि मुलगी ) न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनीच्या योजनेत येणारा प्रीमियम गृहीत धरला आहे.
"कोराेना रक्षक' : एक उत्तम सुवर्णमध्य
ज्यांना नेहमीच्या मेडिक्लेम पॉलिसीमधून पुरेसे संरक्षण (किमान 10 लाख रुपये) मिळत आहे, असे पॉलिसीधारक कोविड-19 साठी वापरल्या जाणाऱ्या कन्झ्युमेबल वस्तूंच्या अतिरिक्त खर्चासाठी "कोरोना रक्षक' पॉलिसीची निवड करू शकतात. याशिवाय ज्यांच्याकडे कोणतीही मेडिक्लेम पॉलिसी नाही, असे लोकदेखील नव्याने मेडिक्लेम पॉलिसी घेऊन आणि "कोरोना रक्षक'चा फायदा मिळवत इतर आजारांबरोबरच कोविड-19 दरम्यान येणाऱ्या अतिरिक्त खर्चाची तरतूद करू शकतात.
"कोरोना रक्षक' पॉलिसीचे स्वरूप
- बेनेफिट स्वरूपातील पॉलिसी.
- कोविड पॉझिटिव्ह आढळल्यास एकरकमी पैसे.
- 18 ते 65 वयोमर्यादा.
- किमान 72 तासांचे हॉस्पिटलायझेशन.
- 50 हजारांपासून ते 2.5 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण.
सकाळ बिमा
सर्व प्रकारच्या विमा योजनांच्या अधिक माहितीसाठी पुढील मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल द्या ः 73508 73508
किंवा पुढील मेल आयडी संपर्क साधा ः marketing@sakalbima.com