महागाई वाढण्याचा अंदाज

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

ताज्या आकडेवारीनुसार सेवा आणि उत्पादन क्षेत्राची कामगिरी खालावली आहे. चलन बाजारात डॉलरसमोर रुपया नीचांकी स्तरावर आहे. ओपेक सदस्य देशांनी उत्पादन गोठवल्याने नजीकच्या काळात कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात. त्यातच चलनातील अवमूल्यन कायम राहिल्यास आयाती बिलात मोठी वाढ होईल. परिणामी महागाईत वाढ होऊ शकते. 


- मयूरेश जोशी, उपाध्यक्ष, अँजल ब्रोकिंग

पतधोरण जैसे थे, कर्ज स्वस्ताई बॅंकांच्या कोर्टात 

मुंबई: नोटाबंदीनंतर किरकोळ बाजारातील मागणी घटली असली तरी नजीकच्या काळात रुपयांचे अवमूल्यन आणि कच्च्या तेलाच्या किमतींमुळे महागाई वाढेल, असा अंदाज रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केला. नोटाबंदीत बॅंकांकडे कोट्यवधींची रोकड जमा झाली असली, तरी ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाल्याने विकासावर होणारा परिणाम लक्षात घेता रेपो दरात कोणतेही बदल न करता पतधोरण "जैसे थे' ठेवले. यामुळे स्वस्त कर्जांसाठी सर्वसामान्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांनी पहिल्यांदाच पतधोरण सादर केले. रेपो दर 6.25 टक्‍क्‍यांवर कायम ठेवला असून, विकासदर आणि महागाईबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. बॅंकेने मार्चपर्यंत महागाई दर 5 टक्के राहील, असे म्हटले आहे. त्याचबरोबर विकासाचा अंदाज 7.6 टक्‍क्‍यांवरून 7.1 टक्‍क्‍यांपर्यंत कमी केला आहे. देशांतर्गत बाजारातील अन्नधान्यांच्या किमती वाढून महागाईचा पारा चढेल, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. तेल उत्पादक देशांचे (ओपेक) कच्च्या तेलाच्या मर्यादित उत्पादन घेण्याचे एकमत झाले.

स्वस्ताई तात्पुरती 
नोटाबंदीमुळे ग्राहकांकडे हाती पैसा नसल्याने गेल्या काही दिवसांपासून किरकोळ बाजारात भाजीपाला आणि नाशवंत पदार्थांच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. मात्र ही घसरण तात्पुरती आहे. नव्या नोटा पुरेशा प्रमाणात बाजारात आल्यानंतर ही परिस्थिती बदलेल, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कर्ज स्वस्ताई बॅंकांच्या हाती
रिझर्व्ह बॅंकेने नोटाबंदीच्या पार्श्‍वभूमीवर 100 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवलेले रोख राखीव प्रमाण पूर्ववत करण्याचे संकेत दिले. यामुळे बॅंकांकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम राहील. जानेवारी 2015 पासून रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात 1.75 टक्‍क्‍याची कपात केली. मात्र त्या प्रमाणात बॅंकांनी ग्राहकांना दरकपातीचा फायदा दिला नाही. याउलट बॅंकांनी एमसीएलआर दरात किरकोळ कपात करून व्याजदर सुधारित केले.

 

Web Title: Projected to grow at inflation