बँक ऑफ महाराष्ट्रचे सीईओ रविंद्र मराठे यांच्यासह सहा जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

- डीएसके यांच्या कागदोपत्री कंपन्यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांसह अन्य 6 जणांवर कारवाई

-पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीनंतर केली अटक  

- डीएसके यांच्या कागदोपत्री कंपन्यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांसह अन्य 6 जणांवर कारवाई

-पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीनंतर केली अटक  

पुणे: डी.एस.कुलकर्णी यांंच्या आर्थिक गुंतवणूकदार घोटाळ्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र मराठे यांच्यासह कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता, माजी अध्यक्ष सुशिल मुनोत (जयपुर), विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे (अहमदाबाद), डीएसके कंपनीचे उपाध्यक्ष राजीव नेवसेकर आणि सीए सुनिल घाटपांडे या सहा जणांना बुधवारी सकाळी आर्थिक गुन्हे शाखेकडुन चौकशीसाठी बोलविण्यात आले. चौकशीअंती नियमबाह्य कर्ज देणे व घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपावरुन त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.

डीएसके यांच्या अस्तित्वात नसलेल्या आणि  केवळ कागदोपत्री बनावट कंपन्यांना पदाचा व अधिकाराचा गैैरवापर करुन नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच डीएसके यांच्या घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप आणि अन्य गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.

आर्थिक गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याचा गुन्हा डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला होता. दिल्लीतून डीएसके आणि त्यांच्या पत्नीला पुणे पोलिसांनी अटक केली. त्यावेळी न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्यानंतर डीएसके कोसळुन पडले होते. त्यानंतर त्यांना ससुन रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. डीएसके घोटाळ्याची व्याप्ती वाढत असताना त्यांच्या काही नातेवाईकांना देखील अटक करण्यात आली. 

दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू असताना बँक ऑफ महाराष्ट्रच्या आजी माजी वरिष्ठ अधिका-यांसह डीएसके कंपनीचे अधिकारी यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले. चौकशीअंती ज्या कंपन्या अस्तित्वात नाही त्या कंपन्यांना नियमबाह्य कर्ज देणे, घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपावरुन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र मराठे यांच्यासह अन्य सहा जणांना आर्थिक गुन्हे शाखेकडुन अटक केली. 

इन्फोबॉक्स 
सर्व सहा जणांवर खालील कलमांतर्गत गुन्हा दाखल : 120 ब, 406, 409, 420, 465, 467, 468, 471, 109 / 34, 13 (1 क), 13 (2).
 

Web Title: Pune police arrested the chairman of bank of Maharashtra and other official for dsk matter