'बँक ऑफ इंग्लंड'च्या गव्हर्नर पदासाठी रघुराम राजन यांचे नाव चर्चेत?

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 एप्रिल 2018

रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नावाचा 'बँक ऑफ इंग्लंड'च्या गव्हर्नर पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून उल्लेख केला जातो आहे.

लंडन: रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नावाचा 'बँक ऑफ इंग्लंड'च्या गव्हर्नर पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून उल्लेख केला जातो आहे. युरोपातील ‘फायनान्शिअल टाइम्स’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार राजन यांच्याकडे बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून बघितले जात असल्याचे वृत्त आहे.  रघुराम राजन हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अर्थतज्ज्ञ असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे ते वयाच्या 40 व्या वर्षी प्रमुख झाले. शिवाय 2005 मध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेल्या शोध निबंधात आर्थिक मंदीचा अंदाजही व्यक्त केला होता. मात्र त्यावेळी त्यांच्या अंदाजाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र तीनच वर्षात राजन यांचे भाकीत खरे ठरले. 

राजन यांच्यासोबत ब्रिटनमधील राजकारणी आणि अर्थतज्ज्ञ श्रिती वडेरा यांचे देखील नाव 'बँक ऑफ इंग्लंड'च्या गव्हर्नर पदासाठी चर्चेत आहे.

सध्याचे बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर मार्क कार्नेय पुढील वर्षी निवृत्त होणार आहेत. ब्रिटनचे चान्सलर फिलीप हॅमंड यांच्यामार्फत आता 'बँक ऑफ इंग्लंड'च्या गव्हर्नर पदासाठी निवड प्रक्रिया सुरु केली जाईल. राजन यांनी गेल्या आठवड्यात  केंब्रिजमधील हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये नोटाबंदीवर टीका करत नोटाबंदीचा निर्णय चुकीचा होता असे सांगितले. शिवाय आरबीआयशी कोणत्याहीप्रकारे सल्ला मसलत न करता सरकारने जनतेवर नोटाबंदीचा निर्णय लादण्यात आला. राजन यांच्यात स्पष्टवक्तेपणा असल्याने  आरबीआयच्या गव्हर्नरपदी असताना देखील त्यांनी आपली मते परखडपणे माडंली होती. 

Web Title: Raghuram Rajan among contenders to head Bank of England