नोटाबंदी ही अतिशय वाईट कल्पना होती : रघुराम राजन

पीटीआय
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ होत असताना नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत घसरण झाली. यामुळे एकूण देशांतर्गत उत्पन्नातही (जीडीपी) मोठी घट झाली, असे मत रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सोमवारी व्यक्त केले. 

नवी दिल्ली : जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ होत असताना नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत घसरण झाली. यामुळे एकूण देशांतर्गत उत्पन्नातही (जीडीपी) मोठी घट झाली, असे मत रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सोमवारी व्यक्त केले. 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजन यांनी नोटाबंदीचे अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम स्पष्ट केले. ते म्हणाले, ''नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत घसरण झाली, हे दर्शविणारे अनेक अभ्यास झाले आहेत. नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेच्या वाढीवर परिणाम झाल्याचे यातून समोर आले आहे. जागतिक अर्थव्यवस्था 2017 मध्ये वेगाने वाढत असताना भारताच्या अर्थव्यवस्थेची पिछेहाट झाली. केवळ नोटाबंदीच नव्हे, तर वस्तू व सेवा कर (जीएसटी) अंमलबजावणीचाही अर्थव्यवस्थेला फटका बसला. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग 2017-18 मध्ये 6.7 टक्‍क्‍यांवर आला होता.'' 

''जीएसटीची अंमलबजावणी अधिक चांगल्या पद्धतीने होण्याची आवश्‍यकता होती. कररचना पूर्णपणे बदलल्यानंतर येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवत पुढे जावे लागते, अन्यथा नव्या कररचनेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या अपरिहार्य ठरतात,'' असे राजन यांनी नमूद केले. 

कर्ज बुडविणे आणि फसवणूक यात फरक 
राजन यांनी त्यांच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयाला मोठ्या बॅंकिंग गैरव्यवहारांची यादी कारवाईसाठी दिली होती. याबद्दल ते म्हणाले, ''या यादीवर काय कारवाई झाली हे मला माहीत नाही. एकावर कारवाई आणि एकाला मोकळे रान असे घडू नये, ही भीती मला वाटते. याचबरोबर कर्ज बुडविणारा आणि गैरव्यवहार करणारा यात फरक करायला हवा. कर्ज बुडविणाऱ्या प्रत्येकाला उचलून तुरुंगात टाकल्यास कोणीच यापुढे धोका पत्करण्यास तयार होणार नाही.'' 

नोटाबंदी आणि जीएसटीचा दुहेरी तडाखा भारतीय अर्थव्यवस्थेला बसला. चलनातून उच्च मूल्याच्या नोटा रद्द करणे ही अतिशय वाईट कल्पना होती. 
- रघुराम राजन, माजी गव्हर्नर, रिझर्व्ह बॅंक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raghuram Rajan criticises Demonetization by Narendra Modi Government