रिझर्व्ह बॅंकेचा निवडणूक धमाका; रेपो दरात पाव टक्का कपात

गुरुवार, 4 एप्रिल 2019

विकासाला चालना देण्याबरोबरच ग्राहकांची क्रयशक्ती वाढण्यासाठी रिजर्व बँकेने सलग दुसऱ्या पतधोरणात रेपो दर पाव टक्याने कमी केला आहे.

मुंबई : विकासाला चालना देण्याबरोबरच ग्राहकांची क्रयशक्ती वाढण्यासाठी रिजर्व बँकेने सलग दुसऱ्या पतधोरणात रेपो दर पाव टक्याने कमी केला आहे. या कपातीनंतर रेपो दर 6.25 टक्क्याएवजी 6 टक्के झाला आहे. दरम्यान आजच्या व्याजदर कपातीमुळे कर्ज दर कमी करण्याचा दबाव बँकांवर वाढणार आहे. निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत बँकेची व्याजदर कपात ग्राहक आणि सत्ताधारी पक्षासाठी फायदेशीर ठरणार आहे.

रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक मंगळवारपासून (ता.2) मुंबईत 
सुरू होती. जागतिक मंदीच्या पार्श्‍वभूमीवर विकासाला चालना देण्यासाठी बॅंकेकडून व्याजदरात पाव टक्का कपात करण्याची शक्‍यता बहुतांश जाणकारांनी व्यक्‍त केली होती. आर्थिक वर्षात पहिले द्वैमासिक पतधोरण बॅंकेकडून थोड्याच वेळात जाहीर केले जाणार आहे. 

"आरबीआय"ने फेब्रुवारीतील पतधोरणात व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात केली होती. मात्र त्याचा फारसा फायदा ग्राहकांना आणि उद्योजकांना झाला नाही. बॅंकांनी व्याजदर कपातीला अल्प प्रतिसाद दिल्याने बाजारात अजूनही कर्जाचा दर जादा आहे. निवडणूक लागू झाली असून सलग दुसऱ्या पतधोरणात व्याजदर कमी केल्यास ग्राहकांना फायदा होईल, या उद्देशाने आरबीआयकडून पतधोरण शिथिल करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.