रिझर्व्ह बँकेकडून दिलासा; रेपो दरात पाऊण टक्क्यांची कपात 

वृत्तसंस्था
Friday, 27 March 2020

आरबीआयकडून एका दशकानंतर रेपो दरात इतकी मोठी कपात करण्यात आली होती. ऑक्टोबर २००८ आणि जानेवारी २००९ मध्ये आरबीआयकडून १ टक्क्याची कपात करण्यात आली होती. 

मुंबई - कोरोना’चे अर्थव्यवस्थेवरील दुष्परिणाम रोखण्यासाठी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक (आरबीआय) सरसावली आहे. केंद्र सरकारपाठोपाठ रिझर्व्ह बँकेने सामन्यांना दिलासा देत रेपो दरात ०.७५ टक्क्याची कपात केली आहे. आता तो ४.४० टक्क्यांवर आला आहे. तर रिव्हर्स रेपो दरात देखील ०.९० टक्क्यांची कपात करून तो चार टक्क्यांवर आणला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी रेपो दरात कपातीची घोषणा केली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आरबीआयकडून एका दशकानंतर रेपो दरात इतकी मोठी कपात करण्यात आली होती. ऑक्टोबर २००८ आणि जानेवारी २००९ मध्ये आरबीआयकडून १ टक्क्याची कपात करण्यात आली होती. 

कर्जदारांना दिलासा 
व्याजदर कपातीचा फायदा कर्जदारांना मिळणार असून 'एमसीएलआर'शी निगडित कर्जाचा हप्ता कमी होणार आहे. 

- Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

बाजारात रोकड उपलब्धतेसाठी कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) दर ४ टक्क्यांवरून ४ टक्के करण्यात आला आहे. परिणामी बँकांना १.७ लाख कोटींची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार आहे. याशिवाय इतरही उपाययोजनांमुळे बाजारात ३.७३ लाख कोटीची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार आहे. 

तीन महिने 'ईएमआय' स्थगित 
रेपो दरात कपात केल्यामुळे कर्जाचे हप्ते कमी होणार असून कर्जाच्या हप्त्यांची (ईएमआय) वसुली तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सल्ला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकांना दिला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने देखील गुरुवारी १.७० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. 

कोरोनामुळे देशभर 'लॉकडाउन'च्या पार्श्वभूमीवर बँकेच्या पतधोरण समितीने नियोजित वेळापत्रकाच्या आठवडाभर आधीच बैठक घेऊन विविध घोषणा केल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने खबरदारीचा उपाय म्हणून १५० कर्मचाऱ्यांचे विलगीकरण केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI cuts repo rate by 75 bps