सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे विलीनीकरण फायदेशीर : ऊर्जित पटेल 

Urjit Patel
Urjit Patel

न्यूयॉर्क - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे विलीनीकरण हे बॅंकिंग क्षेत्रासाठी फायदेशीर ठरणार आहे. बॅंकांच्या एकत्रिकरणामुळे अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत मिळणार असल्याचे मत रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी व्यक्त केले. बॅंकांच्या विलीकरणामुळे अनुत्पादित मत्तांवर योग्य मार्ग काढण्यास कमी अडथळे येतील, असेही पटेल यांनी या वेळी सांगितले. 

कोटक कुटुंबांतर्फे कोलंबिया युनिव्हर्सिटी येथे आयोजित व्याख्यानात गव्हर्नर पटेल बोलत होते. ते म्हणाले, देशात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या बॅंकांची खरेच गरज आहे का, यावर अजूनही कोणाची स्पष्टता नाही; पण मोठ्या प्रमाणात असलेल्या बॅंकांचे मोजक्‍याच बॅंकांमध्ये रूपांतर करून त्यांचे कार्यान्वय केल्यास त्यावर पकड ठेवणे सोपे जाणार आहे. कर्जबुडविण्याच्या कारणास्तव काही बॅंकांचे विलीनीकरण होत आहे, तर काही बॅंकांच्या विलीनीकरणामागे तांत्रिक कारणे आहेत. मात्र होणारे विलीनीकरण बॅंकिंग क्षेत्राच्या फायद्याचे असून त्यामुळे अर्थव्यवस्थेला उभारी मिळणार असल्याचे पटेल यांनी या वेळी सांगितले. 

पटेल म्हणाले की, बॅंकिंग क्षेत्रातील ताळेबंदासोबत केंद्रीय बॅंकेचा पाठशिवणीचा खेळ सुरू असतो. अनिश्‍चिततेच्या वातावरणात सर्व निर्णय घेण्याचे केंद्रीय बॅंकेपुढे आव्हान असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून बॅंकांच्या अनुत्पादित मत्तांवर केंद्रीय बॅंक काम करत असल्याचे पटेल यांनी आवर्जून नमूद केले. केंद्रीय बॅंकेने खासगी भांडवल वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या निधीवर अवलंबित्व असणे, ही केंद्रीय बॅंकेसाठी भूषणावह बाब नाही, असे सांगत पटेल यांनी वायदे बाजार आणि इतर खासगी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार असल्याची ग्वाही दिली. 

नोटाबंदीचे परिणाम तात्पुरते 
नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम हे तात्पुरते होते. सर्वसामान्यांना त्याचा फटका बसला असला तरी ते क्षणिक होते. पत ही चलनापेक्षा अधिक महत्त्वाची असून, चलनतुटवड्यामुळे यावर कोणताही परिणाम झाला नाही. पतवृद्धीकरता केंद्रीय बॅंक कायम सजग असल्याचे पटेल यांनी या वेळी सांगितले. 

एच 1 बी व्हिसा धोरणावर पटेल नाराज 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या "अमेरिका फर्स्ट'च्या धोरणामुळे भारतीयांना अमेरिकेत रोजगार मिळवणे अवघड होत आहे. यावर बोलताना पटेल यांनी अमेरिकेच्या धोरणावर टीका केली. अमेरिकेतील आघाडीच्या कंपन्या ऍपल, सिस्को आणि आयबीएमनं जर जगभरातील हुशार आणि कामाला प्राधान्य देणाऱ्या लोकांना पसंती दिली नसती तर आज त्यांचे अस्त्वित्व असते का, असा प्रश्न उपस्थित करत पटेल यांनी अमेरिकेच्या एच 1 बी व्हिसा नियमात बदल करण्याच्या धोरणावर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खुल्या अर्थव्यवस्थेमुळे जगाला फायदा होत आहे, मात्र याबाबत अमेरिकेची नीती कुठे जात आहे, हा प्रश्न उपस्थित होतो, असेही पटेल म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com