'आरबीआय" साधणार व्याजदरवाढीची हॅटट्रिक

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

मुंबई - महागाई काही प्रमाणात कमी झाली असली, तरी चलन बाजारातील रुपयाची दयनीय स्थिती आणि तूट वाढण्याची शक्‍यता असल्याने रिझर्व्ह बॅंकेकडून आगामी पतधोरणात तिसऱ्यांदा व्याजदर वाढवण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी जून आणि ऑगस्टमधील पतधोरणात रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात वाढ केली होती. नुकताच फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवण्यात आला होता. त्यापार्श्‍वभूमीवर आरबीआयकडून रेपो दरवाढ करण्याची शक्‍यता बळावली आहे.

चलनात पडझड होत असली, तरी अर्थव्यवस्थेची पहिल्या तिमाहीत समाधानकारक कामगिरी राहिली आहे. गेला महिनाभरात डॉलरच्या तुलनेत रुपयाने तळ गाठल्याने बॅंकेची चिंता वाढली आहे. वर्षभरात रुपयाचे 15 टक्‍क्‍यांनी अवमूल्यन झाले आहे. बाजारात रोकड मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्याच्यादृष्टीने पतधोरणात निर्णय होईल, असे बॅंकिंग तज्ज्ञांचे म्हणने आहे. अर्थ खात्याकडून रिझर्व्ह बॅंकेने रोकड वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याचा आशावाद व्यक्त केला आहे. चलनाला सावरण्यासाठी बॅंकेकडून व्याजदर वाढ करण्याची शक्‍यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 80 डॉलरवर गेले आहेत. त्यामुळे आयात बिलात मोठी वाढ होणार आहे. आयातीचा भार तूट वाढवण्यास कारणीभूत असल्याने रिझर्व्ह बॅंकेकडून यावर गांभीर्याने विचार होईल, असे काही बॅंकर्सचे मत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI Interest rate