पिवळ्या रंगाची 20 रुपयांची नवी नोट लवकरच चलनात!

वृत्तसंस्था
Saturday, 27 April 2019

- 20 रुपयांच्या नव्या नोटा लवकरच येणार चलनात.

- जुन्या नोटाही राहणार चलनात.

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आता हिरव्या-पिवळ्या रंगाची नवी 20 रुपयांची नोट लवकरच चलनात आणण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेने याबाबतची माहिती आज (शनिवार) दिली. या नव्या नोटांवर रिझर्व्ह बँकेचे नवे गर्व्हनर शक्तिकांत दास यांचे हस्ताक्षर असणार आहे. 

रिझर्व्ह बँकेकडून यापूर्वी दोन हजार, पाचशे, दोनशे, शंभर, पन्नास आणि दहा रुपयांच्या नोटा चलनात आणल्या आहेत. मात्र, वीस रुपयांची नवी नोट अद्याप चलनात आणण्यात आली नाही. त्यानंतर आता वीस रुपयांची नवी नोट चलनात आणली जाणार आहे. ही नोट महात्मा गांधी सीरिजची असणार असून, या नव्या नोटेचा आकार 63x129 मिलीमिटर असणार आहे. तसेच या नोटेच्या सुरक्षा बँडवर हिंदीमध्ये भारत आणि आरबीआय लिहिण्यात आले आहे. या नव्या नोटेच्या दोन्ही बाजूंना फुलांचे डिझायनचे प्रिंट करण्यात आले आहे. शिवाय या नोटेमध्ये महात्मा गांधी यांचा फोटोही देण्यात आला आहे. 

दरम्यान, जरी या नव्या नोटा चलनात येणार असल्या तरीदेखील 20 रुपयांच्या जुन्या नोटा चलनात राहणार आहेत, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI to issue new greenish yellow coloured Rs 20 notes soon