आता 100 रुपयांची नवी नोट येणार

वृत्तसंस्था
बुधवार, 7 डिसेंबर 2016

मुंबई: नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता रिझर्व्ह बॅंकेने चलनातील 100 रुपयांच्याही नव्या नोटा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, 100 रुपयांच्या जुन्या नोटाही चलनात कायम राहणार आहेत. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेने आज (मंगळवार) अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले.

मुंबई: नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता रिझर्व्ह बॅंकेने चलनातील 100 रुपयांच्याही नव्या नोटा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, 100 रुपयांच्या जुन्या नोटाही चलनात कायम राहणार आहेत. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेने आज (मंगळवार) अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले.

काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी केली होती. त्यानंतर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी देशभरातील बॅंका आणि एटीएमसमोर खातेदारांच्या रांगा लागल्याचे चित्र निर्माण झाले होते. नोटाबंदीनंतर पुरेसे पैसे बॅंकांमध्ये उपलब्ध नसल्याचेही बहुतांश ठिकाणी दिसत आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने 100 रुपयांच्याही नव्या नोटा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. 100 रुपयांच्या जुन्या नोटा बाद होणार नसल्याने सध्याच्या व्यवहारांवर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्‍यता नाही. या नव्या नोटांवर गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल. या नोटांवरील सुरक्षेच्या खुणा अधिक ठळक असतील.

100 रुपयांच्या नव्या नोटा किती छापणार आहे, हे रिझर्व्ह बॅंकेने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर 500 रुपयांच्या नव्या नोटा छापण्यात आल्या आहेत; तर 2000 रुपयांची नोटही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, सुट्टे पैसे नसल्याने 2000 रुपयांच्या नोटेचा प्रत्यक्षात वापर करण्यात अडचणी येत असल्याच्याही ग्राहकांच्या तक्रारी आहेत. या पार्श्‍वभूमीवर 20 आणि 50 रुपयांच्याही नव्या नोटा छापणार असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने यापूर्वी सांगितले आहे.

Web Title: RBI to launch new Rs. 100 currency note soon