RBI Monetary Policy: रेपो दरात बदल नाही, भविष्यात व्याजदरात बदल होण्याची शक्यता

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 4 December 2020

मॉनेटरी पॉलिसी जाहीर करताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही आणि तो पूर्वीसारखाच राहील.

नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मॉनेटरी पॉलिसीची जाहीर केली आहे. सलग तिसऱ्यांदा कोणताही बदल झालेला नाही. मॉनेटरी पॉलिसी जाहीर करताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही आणि तो पूर्वीसारखाच राहील.

रेपो रेट पूर्वीप्रमाणे 4 टक्के ठेवण्यात आला आहे. तथापि, गरज पडल्यास भविष्यात व्याजदरात बदल करता येईल, असही रिझर्व्ह बँकेने दिले आहे. आरबीआयच्या एमपीसीने (Monetary Policy Committee of India) व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय एकमताने घेतला.

कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने ऑक्टोबरमध्ये व्याजदरात बदल केला नाही. मॉनेटरी पॉलिसीची घोषणा करताना आरबीआयच्या गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, या आर्थिक वर्षात Q3 आणि Q4 मध्ये वेगवान वाढ अपेक्षित आहे, जो 2021 मध्ये रिअल जीडीपी -7.5 टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. दास म्हणाले की, शहरांमध्ये उत्पादने आणि सेवांची मागणी हळूहळू वाढत आहे. ग्रामीण भागात मागणी वाढवण्याची गरज आहे. ते म्हणाले की, या आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात अर्थव्यवस्थेत अपेक्षेपेक्षा वेगाने सुधारणा झाली आहे. 

महागाई दर उच्च राहणार-
शक्तिकांत दास म्हणाले की, देशातील महागाईचा दर जास्त राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे MPCने एकमताने रेपो रेट न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही आवश्यक ती सर्व पावले उचलू, असे ते म्हणाले.

रेपो रेट म्हणजे काय-
दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज भासत असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी RBI देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. या अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट (REPO Rate) म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्जं देतात. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की बँकाही आपल्या कर्जांचे दर वाढतात.

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
बरेचदा दिवसभर व्यवहार करूनही बँकांकडे मोठी रक्कम शिल्लक राहत असते. ही रक्कम बँका अल्प मुदतीसाठी रिझर्व्ह बँकेकडे जमा करत असते. त्या रकमेवर रिझर्व्ह बँक ज्या दराने व्याज देते त्या दराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. वास्तविक पाहता रिव्हर्स रेपो रेट हा बाजारातली पैशांची तरलता म्हणजे लिक्विडिटी नियंत्रित करण्याचं काम करतो. जेव्हा बाजारात जास्त लिव्हिडिटी असते तेव्हा रिझर्व्ह बँका रिव्हर्स रेपो रेट वाढते, त्यामुळे जास्तीत जास्त व्याज मिळवण्यासाठी बँका स्वतःच्या रकमा रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. परिणामी बाजारातल्या पैशांची तरलता कमी होते.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI Monetary Policy repo rate unchanged 3 times