'आरबीआय'कडून व्याजदर 'जैसे थे'

 'आरबीआय'कडून व्याजदर 'जैसे थे'

मुंबई: रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) आज (गुरुवार) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दर 6 टक्‍क्‍यांवर कायम ठेवण्यात आला असून रिव्हर्स रेपो दर देखील 5.75 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. तसेच रोख राखीव प्रमाण (सीआरआर) 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहे. बँकांमधील बुडीत कर्जाचे प्रमाण आणि महागाईवर लक्ष ठेऊन असल्याचे आरबीआयने यावेळी सांगितले आहे. चालू आर्थिक वर्षातील हा पहिलाच द्वैमासिक पतधोरण आढावा आहे.

रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखालील पतधोरण समितीची दोन दिवसीय बैठक कालपासून सुरू झाली आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने व्याजदरात कपात होण्याची शक्‍यता कमीच होती. 

या बैठकीकडे आधीपासूनच उद्योग क्षेत्र आणि शेअर बाजाराचे लक्ष लागले होते. गेल्या आढावा बैठकीत व्याजदरात बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या आढावा बैठकीत रेपो दरात 0.25 टक्के कपात करून तो 6 टक्‍क्‍यांवर आणण्यात आला होता. हा मागील सहा वर्षांतील नीचांकी दर ठरला होता. बॅंकर आणि तज्ज्ञ यांनी आधीपासूनच आरबीआयकडून रेपो रेट ‘जैसे थे’ ठेवला जाण्याची शक्यता व्यक्त केली होती. 

पटेल यांच्या नेतृत्वाखालील सहा जणांच्या  पतधोरण समितीमध्ये तीन रिझर्व्ह बॅंकेचे अधिकारी आणि तीन सरकारचे प्रतिनिधी असतात. व्याजदरांबाबत समितीचे समान मत झाल्यास ऊर्जित पटेल यांना गव्हर्नरांचा विशेषाधिकार वापरून निर्णय घेण्याची तरतूद आहे.

रेपो दर म्हणजे काय? 
रेपो दर म्हणजे ज्या दराने बॅंका रिझर्व बॅंकेकडून अल्पमुदतीची कर्जे घेतात तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बॅंकांना रिझर्व बॅंकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं;तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बॅंकेला स्वस्तात कर्ज मिळणं. म्हणजेच रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बॅंकांना ग्राहकांना द्यावयाच्या कर्जांचे दरही वाढवावे लागतात;तर हा दर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय? 
रिव्हर्स रेपो दर म्हणजे रेपो दराच्या अगदी उलट संकल्पना. बॅंका त्यांच्याकडील जास्तीचा निधी ठेवींच्या रूपात रिझर्व बॅंकेकडे जमा करतात. या ठेवींवर रिझर्व्ह बॅंक बॅंकांना देत असलेल्या व्याजदराला रिव्हर्स रेपो दर म्हणतात.

रेपो दर (Policy Repo Rate): 6.00%
रिव्हर्स रेपो दर (Reverse Repo Rate): 5.75%
एमएसएफआर  (Marginal Standing Facility Rate): 6.25%  एमएसएफआर 
बँक रेट (Bank Rate): 6.25%
सीआरआर (CRR): 4%
एसएलआर (SLR): 19.5%

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com