आजपासून पैसे काढण्यावरील सर्व निर्बंध मागे

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मार्च 2017

20 फेब्रुवारीला म्हणजेच पहिल्या टप्प्यात दर आठवड्याला पन्नास हजार रुपये बचत खात्यातून काढण्यात परवानगी देण्यात आली होती. 20 फेब्रुवारीला आरबीआयने पैसे काढण्यासाठीच्या मर्यादा वाढवल्याने देशातील अनेक भागांतून एटीएम केंद्रातील पैसे संपल्याची तक्रार आली होती.

नवी दिल्ली: मोदी सरकारने 8 नोव्हेंबररोजी पाचशे आणि हजाराच्या नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर एटीएम आणि बँकांमधून पैसे रोख रक्कम काढण्यावर मर्यादा घालण्यात आली होती. आजपासून (सोमवार) बॅंक अथवा एटीएममधून पैसे काढण्यावरील सर्व निर्बंध उठवण्यात आले आहे. त्यामुळे आता बँकांमधून लोक आधीप्रमाणेच पैसे काढू शकणार आहेत.

गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने बँक खात्यामधून पैसे काढण्यावरील मर्यादा दोन टप्प्यांमध्ये उठविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. याआधी आठवड्यास एटीएममधून आणि बॅंकेतून जास्तीत जास्त 24 हजार रुपये (बचत खाते) काढण्यासच परवानगी होती. तसेच 16 जानेवारी रोजी आरबीआयने एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा 10 हजार रुपयांपर्यंत वाढविली होती. याचबरोबर, आठवड्यास एटीएममधून जास्तीत जास्त 24 हजार रुपये (बचत खाते) काढण्यासच परवानगी देण्यात आली होती.

20 फेब्रुवारीला म्हणजेच पहिल्या टप्प्यात दर आठवड्याला पन्नास हजार रुपये बचत खात्यातून काढण्यात परवानगी देण्यात आली होती. 20 फेब्रुवारीला आरबीआयने पैसे काढण्यासाठीच्या मर्यादा वाढवल्याने देशातील अनेक भागांतून एटीएम केंद्रातील पैसे संपल्याची तक्रार आली होती. त्यावेळी देशात पुन्हा चलनटंचाई निर्माण झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत असल्याने प्रत्येकाने बँक किंवा एटीएममधून गरजेपुरतेच पैसे काढण्याचे आवाहन केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी केले होते.

Web Title: RBI removes limit on cash withdrawal, banks go back to pre-demonetisation era