रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दरात पाव टक्क्याची वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

मुंबई : रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात बदल करत पाव टक्क्याची वाढ करण्याचा निर्णय आज (बुधवार) घेतला. आता आरबीआयने रेपो रेट  6 टक्क्यांवरून पाव टक्क्याने वाढवत  6.25 टक्‍क्‍यांवर आणला आहे. तर, रिव्हर्स रेपो दर देखील 0.25 टक्क्याने वाढवून 6 टक्के करण्यात आला आहे.  साडेचार वर्षांनंतर बॅंकेकडून दरवाढ करण्यात आली आहे. गेल्या चार पतधोरणात रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात कोणतेही बदल केले नव्हते.  

मुंबई : रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात बदल करत पाव टक्क्याची वाढ करण्याचा निर्णय आज (बुधवार) घेतला. आता आरबीआयने रेपो रेट  6 टक्क्यांवरून पाव टक्क्याने वाढवत  6.25 टक्‍क्‍यांवर आणला आहे. तर, रिव्हर्स रेपो दर देखील 0.25 टक्क्याने वाढवून 6 टक्के करण्यात आला आहे.  साडेचार वर्षांनंतर बॅंकेकडून दरवाढ करण्यात आली आहे. गेल्या चार पतधोरणात रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात कोणतेही बदल केले नव्हते.  

 अन्नधान्ये, भाजीपाला, इंधनातील वाढत्या किंमतींनी महागाईचा आगडोंब उसळल्याने आरबीआयवरील दबाव वाढला होता. महागाईची चिंता लागून राहिलेल्या "आरबीआय"च्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक सोमवारपासून मुंबईत सुरू होती. आता रेपो दरवाढ झाल्याने कर्जे महागणार असून मासिक हप्त्याचा जादा भार कर्जदाराला सोसावा लागण्याची शक्यता आहे. 

गेल्या महिनाभरात बहुतांश बॅंकांनी ठेवी आणि कर्जदरात वाढ केली होती. त्यामुळे आता आरबीआयने रेपोदर वाढवल्याने कर्जाचा दर आणखी वाढण्याची शक्यता बळावली आहे. एप्रिलमधील पतधोरणाच्या बैठकीत डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य आणि मायकल डी पात्रा या दोन सदस्यांनी व्याजदरवाढीच्या बाजुने कौल दिला होता. यंदा प्रथमच पतधोरण समितीची बैठक तीन दिवस चालली. आधीपासूनच रेपोदरात किमान पाव टक्क्याची वाढ अपेक्षित होती. 

 रेपोदर वाढवल्यास काय होते?
 रिझर्व्ह बॅंकेने रेपोदर वाढवल्यास कर्जाचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

 रेपोदर कमी झाल्यास काय होते?
रिझर्व्ह बॅंकेने रेपोदर कमी केल्यास कर्जे स्वस्त होण्याची शक्यता असते. म्हणजे बँकांकडून कर्जाच्या दरात कपात केली जाते. 

रेपो दर म्हणजे काय? 
रेपो दर म्हणजे ज्या दराने बॅंका रिझर्व बॅंकेकडून अल्पमुदतीची कर्जे घेतात तो दर. देशातील बँकांना दररोजच्या व्यवहारांसाठी मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचे कर्ज देते. रेपो रेट वाढणे म्हणजे बॅंकांना रिझर्व बॅंकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होते ;तर रेपो रेट कमी होणे म्हणजे बॅंकेला स्वस्तात कर्ज उपलब्ध होतात. म्हणजेच रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बॅंकांना ग्राहकांना द्यावयाच्या कर्जांचे दरही वाढवावे लागतात;तर हा दर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय? 
रिव्हर्स रेपो दर म्हणजे रेपो दराच्या अगदी उलट संकल्पना. बॅंका त्यांच्याकडील जास्तीचा निधी ठेवींच्या रूपात रिझर्व बॅंकेकडे जमा करतात. हा निधी बँका अल्प मुदतीसाठी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. या ठेवींवर रिझर्व्ह बॅंक बॅंकांना देत असलेल्या व्याजदराला रिव्हर्स रेपो दर म्हणतात. वास्तविक पाहता रिव्हर्स रेपो रेट हा बाजारातली पैशांची तरलता म्हणजे 'लिक्विडिटी' नियंत्रित करण्याचे काम करतो. जेव्हा बाजारात जास्त लिक्विडिटी असते तेव्हा रिझर्व्ह बँका रिव्हर्स रेपो रेट वाढवते, त्यामुळे जास्तीत जास्त व्याज मिळवण्यासाठी बँका स्वत:च्या रकमा रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. परिणामी बाजारातल्या पैशांची तरलता कमी होते.

सीआरआर म्हणजे काय?

सीआरआर म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार प्रत्येक बँकेला तिच्याकडे असलेल्या एकूण रकमेचा काही हिस्सा रिझर्व्ह बँकेकडे जमा करावा लागतो. या रकमेचं प्रमाण म्हणजेच सीआरआर होय.

रेपो दर 6.25 टक्के 
रिव्हर्स रेपो दर 6.00 टक्के 

Web Title: RBI repo rate hike by 25 bps to 6.25%