RBI चा धक्कादायक खुलासा; सरकारी बँकांची 1 लाख 48 हजार कोटींची फसवणूक

सूरज यादव
Thursday, 23 July 2020

देशातील 18 सरकारी बँकांची एकूण 1 लाख 48 हजार 427 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाली आहे. फसवणुकीची एकूण 12 हजार 461 प्रकरणं दाखल करण्यात आली आहेत.

नवी दिल्ली - बँकांची फसवणूक करणाऱ्यांची आणि त्यातून बँकांचे किती नुकसान झाले याची आकडेवारी माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. यात रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार 2019-20 या आर्थिक वर्षात देशातील 18 सरकारी बँकांची एकूण 1 लाख 48 हजार 427 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाली आहे. फसवणुकीची एकूण 12 हजार 461 प्रकरणं दाखल करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वात मोठा दणका स्टेट बँक ऑफ इंडियाला बसला आहे. या बँकेची तब्बल 44 हजार 612 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. बँकेत 6 हजार 964 फसवणुकीची प्रकरणं आहेत. देशातील 18 सरकारी बँकांच्या फसवणुकीपैकी 30 टक्के रक्कम एकट्या एसबीआयची आहे. 

एसबीआय पाठोपाठ पंजाब नॅशनल बँकेलाही मोठा फटका बसला आहे. एप्रिल 2019 ते मार्च 2020 या काळात पीएनबीमध्ये 395 फसवणुकीची प्रकरणे आहेत. यातून बँकेची 15 हजार 354 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. बँख ऑफ बडोदाची 349 प्रकरणांमध्ये 12 हजार 586 कोटी रुपयांची फसवणुक झाली असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विजया बँक आणि देना बँकेचं विलिनकरण एप्रिलमध्ये कऱण्यात आलं आहे. 

आणखी वाचा - देशात इतक्या कोटींची कर्जवसुली थकलेलीच

युनियन बँक ऑफ इंडियात 424 प्रकरणांमध्ये 9 हजार 316 कोटी रुपयांची तर बँक ऑफ इंडियात 200 प्रकरणांमध्ये 8 हजार 69 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याशिवाय कॅनरा बँकेला 7 हजार 519 कोटी आणि इंडियन ओव्हरसीज बँकेला 7 हजार 275 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. इलाहबाद बँकेला 896 प्रकऱणांमध्ये 6 हजार 973 कोटी रुपयांचा तर युको बँकेची 5 हजार 384 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. 

रिझर्व्ह बँकेने माहितीच्या अधिकारात सांगितलं की, एप्रिल 2019 ते मार्च 2020 या कालावधीत ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सला 5 हजार 340 कोटी रुपयांचा दणका बसला आहे. सिंडिकेट बँकेची 4 हजार 999 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. कॉर्पोरेशन बँकेला 4 हजार 816 कोटी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 900 फसवणुकीची प्रकरणे समोर आली असून यातून बँकेला 3 हजार 993 कोटींचा फटका बसला आहे. 

आणखी वाचा - देशातील 5 सरकारी बँकांचे होणार खाजगीकरण, केंद्राकडून सुरु आहे तयारी

आंध्रा बँकेत 115 फसवणुकीच्या प्रकऱणात 3 हजार 462 कोटींचा दणका बसला असून बँक ऑफ महाराष्ट्रची 3 हजार 391 कोटींची फसवणूक झाली आहे. यूनाइटेड बँक ऑफ इंडियाची 2 हजार 679 कोटींची तर  इंडियन बँकेची 225 प्रकरणांमध्ये 2 हजार 254 कोटींची फसवणूक झाली आहे. पंजाब अँड सिंध बँकेलासुद्धा 397 कोटींचा चुना लावला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI says in RTI info 1 48 lakh crore fraud in government banks last year