मंदीत संधीचा शोध... खास तुमच्यासाठी!

Seminar
Seminar

गेल्या महिन्याभरात शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक जवळजवळ ३९ हजारांवरून आता ३४ हजारांवर आला आहे. वाढलेले व्याजदर, घसरणारा रुपया आणि पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमती; याबरोबरच काही राज्ये आणि लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका या सर्वांच्याच बातम्यांमुळे साशंकता आणि काळजी वाढत आहे. त्यातच, ‘शेअर बाजारात मोठी घसरण... ‘सेन्सेक्‍स’ ..... अंशांनी कोसळला,’ अशा बातम्या वाचल्या, की शेअर बाजाराशी जोडलेल्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदार संभ्रमित होतात, घाबरतात. कारण हाच बाजार तेजीत असताना त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढताना दिसत होते; पण आता बाजार घसरला की मूल्य कमी झालेले दिसते. त्यामुळे मनात घबराट निर्माण होते. आपण केलेली गुंतवणूक चुकली तर नाही ना, अशा शंका येऊ लागतात. कमी भावात (एनएव्ही) जास्त युनिट्‌स मिळण्याची संधी असतानाही नवी गुंतवणूक करायला मन धजावत नाही, उत्साह वाटत नाही. उलट, ‘म्युच्युअल फंडातील गुंतवणूक विकून टाकायला हवी,’ अशी भावना बळावू लागते आणि याच भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. सर्वसामान्य गुंतवणूकदारांची नेमकी हीच स्थिती लक्षात घेऊन ‘सकाळ मनी’ने म्युच्युअल फंड क्षेत्रातील तज्ज्ञांचे जनजागृतीपर सेमिनार आयोजित करण्याचे ठरविले आहे. थोडक्‍यात, मंदीसदृश वातावरणात संधी कशी शोधली पाहिजे, याचे थेट, ‘लाइव्ह’ मार्गदर्शन तमाम नागरिकांना लाभणार आहे.

गुंतवणुकीचा कल बदलतोय
गेल्या तीन-चार वर्षांत म्युच्युअल फंडांचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे म्युच्युअल फंडांच्या योजनांकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एसआयपी) घराघरांत पोचला. दरमहा ७५०० कोटी रुपयांची गुंतवणूक या मार्गातून होऊ लागली. दीर्घ मुदतीसाठी बाजारात गुंतवणूक करण्याचा हा योग्य मार्ग अनेकांनी अंगीकारला. म्युच्युअल फंडात खासगी क्षेत्राच्या प्रवेशाला २५ वर्षे पूर्ण होत असताना त्यांची एकत्रित मालमत्ता २५ लाख कोटींच्या उच्चांकी पातळीवर पोचली. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स इन इंडिया’ने (ॲम्फी) दिलेल्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोचली आहे. महागाई दरावर मात करून ‘खऱ्या अर्थाने परतावा’ मिळवायचा असेल तर इक्विटी या ॲसेट क्‍लासची कास धरणे गरजेचे ठरत आहे आणि याची जाणीव हळूहळू गुंतवणूकदारांना होऊ लागली आहे. त्याचेच प्रतिबिंब म्युच्युअल फंडांकडे वाढत चाललेल्या गुंतवणुकीच्या आकड्यांतून दिसून येत आहे. यानिमित्ताने पारंपरिक गुंतवणूक प्रकारांकडून काहीशा नव्या गुंतवणूक प्रकाराकडे नागरिकांचा कल वाढत चालल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे.  

‘सकाळ मनी’चा प्रभावी उपक्रम
बदलत्या काळाची गरज नेमकी ओळखून, सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या आर्थिक समृद्धीसाठी एक चांगला गुंतवणूक प्रकार प्रभावीपणे सादर करण्याचे ‘सकाळ मनी’ने ठरविले आहे. याचे पहिले पाऊल म्हणून (www.sakalmoney.com) या नव्या वेबसाइटच्या माध्यमातून प्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मराठी तसेच इंग्रजी अशा दोन भाषांत कार्यरत असलेल्या या वेबसाइटचा लाभ समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांना घेता येत आहे. म्युच्युअल फंडासह पर्सनल फायनान्स क्षेत्रातील ताज्या घटना- घडामोडींच्या बातम्या आणि तज्ज्ञांचे लेखही या ठिकाणी वाचायला मिळत आहेत. त्यालाच पूरक अशा ‘धन की बात’ या पानाच्या माध्यमातून या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर लेखही वाचकांसमोर मांडले जात आहेत. ‘सकाळ मनी’च्या या उपक्रमाची चर्चा आता राज्यभर सुरू झाली असून, त्याला वाचक, गुंतवणूकदार आणि स्वतंत्र आर्थिक सल्लागारांकडून (इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्स- आयएफए) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ‘सकाळ मनी’च्या साथीने आर्थिक भरभराटीची संधी उपलब्ध झाल्याने अनेक जण या उपक्रमात सहभागी होत आहेत.

आता थेट नागरिकांशी संवाद
या उपक्रमाचे पुढील पाऊल म्हणून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसंदर्भात थेट नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ‘सकाळ मनी’ने जनजागृतीपर सेमिनार घेण्यास सुरवात केली आहे. चार महिन्यांपूर्वी ‘धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड’ या सेमिनारचे आयोजन पुणे आणि चिंचवडमध्ये करण्यात आले होते. सर्व वयोगटांतील नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. हीच बाब लक्षात घेऊन अशाच प्रकारचे गुंतवणूकविषयक मार्गदर्शनपर उपक्रम पुण्याबरोबरच राज्याच्या अन्य शहरांतही राबविण्याचे ‘सकाळ मनी’ने ठरविले आहे. या वेळी एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या सहकार्याने पुण्यात २६ ऑक्‍टोबरला, तर कोल्हापूर व नाशिकमध्ये २ नोव्हेंबरला खास सेमिनारचे आयोजन केले जाणार आहे. भांडवली बाजाराचे विश्‍लेषण करताना, या क्षेत्रातील ताज्या घटना-घडामोडींचे संदर्भ देत गुंतवणूकदारांना प्रभावीपणे मार्गदर्शन करण्यासाठी एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे कार्यकारी संचालक व मुख्य गुंतवणूक अधिकारी प्रशांत जैन, वरिष्ठ उपाध्यक्ष श्‍यामली बसू आणि उपाध्यक्ष अशोक कानावाला हे खास उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील सेमिनारला प्रसिद्ध भांडवली बाजारतज्ज्ञ कुंतल शहा हेही उपस्थित असतील. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना समजेल अशी परिणामकारक भाषाशैली हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे अशा प्रख्यात व अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळण्याची मंदीतील ही संधी ‘चुकवू नये’ अशीच आहे.  

प्रवेश विनामूल्य... पण नावनोंदणी आवश्‍यक
‘सकाळ मनी’ आणि एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या वतीने आयोजित केले जाणारे तिन्ही सेमिनार सर्वांसाठी विनामूल्य खुले असून, त्याला उपस्थित राहण्यास इच्छुक असलेल्यांना संबंधित दूरध्वनी क्रमांकावर फक्त मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर त्यांना रजिस्ट्रेशन लिंक असणारा ‘एसएमएस’ पाठविला जाणार आहे. त्या लिंकवर ‘क्‍लिक’ केल्यानंतर आपली माहिती भरून ती ‘सबमिट’ करावी लागणार आहे. त्यानंतर येणारा ‘ओटीपी’ टाकल्यावर सेमिनारसाठीचे रजिस्ट्रेशन झाल्याचा नंबर मिळणार आहे. हा नंबर सेमिनारस्थळी दाखविल्यानंतरच नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. ‘प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य’ या तत्त्वावर हा प्रवेश दिला जाणार आहे. आसनसंख्या मर्यादित असल्यामुळे या सुवर्णसंधीचा लाभ सर्वसामान्य नागरिकांबरोबरच इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्सनी (आयएफए) घ्यावा आणि त्वरित नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. या सेमिनारसाठी नावनोंदणी करून प्रत्यक्ष उपस्थित राहिलेल्या नागरिकांना म्युच्युअल फंडाविषयी सविस्तर माहिती देणारे पुस्तक ‘सकाळ मनी’च्या सल्लागारांकडून नंतर स्वतंत्रपणे भेटून दिले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com