अल्पकालीन उद्दिष्टासाठी ‘आरडी’चा मार्ग उत्तम!

Recurring-Deposit
Recurring-Deposit

‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही म्हण खऱ्या अर्थाने बॅंकांमधील गुंतवणुकीला लागू पडते. आता बॅंकेच्या ठेवींमध्ये विविध प्रकार असतात. परंतु, विशिष्ट आणि निश्‍चितकाळी येणाऱ्या खर्चाची तरतूद करण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे रिकरींग डिपॉझिट अर्थात ‘आरडी’! आपल्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारचे खर्च हे ठराविक कालावधीत निश्‍चितपणे येत असतात. उदाहरण द्यायचे झाले, तर आपण आयुर्विमा, आरोग्यविमा, दुचाकी वा चारचाकी वाहनांचा विमा उतरवत असतो. दर वर्षी त्याचा हप्ता (प्रिमियम) भरावा लागतोच. त्या एकरकमी हप्त्याचा ताण येऊ द्यायचा नसेल, तर ज्या महिन्यात तो हप्ता देय असतो, त्याच महिन्यात एक वर्षासाठी ‘आरडी’ सुरू करणे उपयोगाचे ठरते. अशा विम्याचा रकमेस १२ ने भागून येणाऱ्या रकमेचे एक वर्षाचे रिकरिंग सुरू केल्यास हप्त्याची रक्कम आपोआप साठत जाते. ज्या बॅंकेत आपल्या पगाराचे खाते असते, शक्‍यतो त्याच बॅंकेत रिकरिंग खाते उघडणे सोईचे जाते. अशा खात्याला ‘स्टॅंडिंग इन्स्ट्रक्‍शन’ची सूचना देऊन ठेवल्यास दर महिन्याला रिकरिंगच्या हप्त्याएवढी रक्कम आपल्या पगाराच्या खात्यातून आपोआप वळती करून घेतली जाऊ शकते. यामुळे हप्ता भरण्यातील दिरंगाई टळू शकते. याशिवाय याचे दोन फायदे होतात. 

आयुर्विम्याचा हप्ता वार्षिक पद्धतीने भरल्यास कंपनीकडून थोडी सवलत मिळते; शिवाय दुसरीकडे रिकरिंगचे थोडेफार व्याजही मिळते. एक वर्षानंतर ‘आरडी’च्या मुदतपूर्तीच्या पैशातून आपण विम्याचे हप्ते सहजपणे भरू शकतो. फक्त दर वर्षी त्या-त्या महिन्यात एक वर्षासाठी रिकरिंगचे खाते उघडण्याचा नेम चुकू द्यायचा नाही, ही शिस्त मात्र पाळावी लागते. आयुर्विम्याप्रमाणे मेडिक्‍लेमचा हप्ता, वाहनांचा हप्ता यासाठीदेखील असेच नियोजन केल्यास आर्थिक भार जाणवत नाही.

शिक्षण, पर्यटनाची सोय
याप्रमाणेच आपण इतर कारणांसाठीही रिकरिंग खाते उघडून भविष्याची तरतूद उत्तम प्रकारे करू शकतो. मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी शैक्षणिक वर्ष सुरू होणाऱ्या महिन्यात रिकरिंग खाते उघडल्यास शाळा-कॉलेज सुरल होताना अधिक बोजा जाणवणार नाही. सध्या १० वी व १२ वीच्या कोचिंग क्‍लासेसची फी काही लाखांत असते. मुले ५-६ वीत असतानाच पाच वर्षांचे रिकरिंग खाते सुरू केल्यास १०-१२ वीला आपल्याला धावाधाव करावी लागणार नाही. आजकाल पर्यटनाकडे लोकांचा ओढा वाढला आहे. दर वर्षी सहकुटुंब फिरायला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या पर्यटन खर्चाची तरतूददेखील आपण दरमहा रिकरिंग डिपॉझिटच्या माध्यमातून करू शकतो. पर्यायाने पैशाच्या ‘टेन्शन’शिवाय पर्यटनाचा आनंद लुटता येऊ शकतो. 

सर्वांनाच ‘बोनस’चा आनंद
दिवाळी हा आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा सण. या वेळी नेहमीच्या मासिक खर्चापेक्षा अधिक रक्कम खर्च होत असते. काही नोकरदारांना काही प्रमाणात बोनस मिळतोही; पण सर्वांना हा लाभ मिळत नाही. पण, याची पुरेशी तरतूद आपण दरमहा रिकरिंग डिपॉझिटच्या माध्यमातून करू शकतो. अंदाजे येणारा खर्च भागीले १२ केल्यास दरमहा किती रुपयांचे रिकरिंग खाते सुरू करावे लागेल, हे आपण ठरवू शकतो. उदा. दिवाळीसाठी २४ हजार रुपये अधिक लागणार असतील, तर २४ हजार भागीले बारा म्हणजे दरमहा दोन हजार रुपयांचे एक वर्षासाठी रिकरिंग केल्यास दिवाळी खर्चासाठी वेगळी तरतूद करावी लागणार नाही आणि अप्रत्यक्षपणे सर्वांनाच ‘बोनस’चा आनंद मिळू शकेल.

रिकरिंग डिपॉझिट आपण कोणत्याही क्षणी मुदतपूर्व मोडू शकतो. यात मुद्दलाचे नुकसान होत नाही; थोडेफार व्याज कमी मिळते. काही बॅंकामध्ये तत्काळ गरजेसाठी रिकरिंग डिपॉझिटवर कर्ज देण्याची सुविधाही उपलब्ध असते. बॅंकांच्या रिकरिंग डिपॉझिटवर मिळणारा परतावा बाजारातील अन्य परताव्याच्या तुलनेत थोडा कमी असेल; पण हा परतावा निश्‍चित असतो.
(लेखक श्री पंचगंगा नागरी सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com