नोटाबंदीमुळे व्याजदर कपातीची शक्‍यता

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

नोटाबंदीची आकडेवारी जाहीर होणार?
रिझर्व्ह बॅंकेच्या उद्याच्या पतधोरण आढाव्यात रद्द नोटा नेमक्‍या किती जमा झाल्या याची माहिती उघड करण्याची शक्‍यता आहे. केंद्र सरकारने 8 नोव्हेंबरला पाचशे व हजारच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. या नोटांचे मूल्य 15.15 लाख कोटी रुपये होते. यातील 50 हजार कोटी रुपयांच्या रद्द नोटा बॅंकिंग यंत्रणेत परत आल्या नसण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

मुंबई : नोटाबंदीचा विकासदरावर होणारा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून उद्या (बुधवार) होणारा पतधोरण आढावा आणि एप्रिलमधील आगामी पतधोरण आढावा यामध्ये व्याजदर कपात होईल, असा अंदाज "बॅंक ऑफ अमेरिका मेरील लिंच' या गुंतवणूक सेवा संस्थेने मंगळवारी व्यक्त केला.

"बॅंक ऑफ अमेरिका मेरील लिंच'ने नोटाबंदीबाबत सर्वेक्षण केले आहे. यात दोन हजार जणांकडून नोटाबंदीचे परिणाम जाणून घेण्यात आले. यातील 60 टक्के जणांनी नोटाबंदीचा व्यवसायावर परिणाम झाल्याचे म्हटले आहे. या सर्वेक्षणातून असा निष्कर्ष निघाला आहे, की नोटाबंदीमुळे विकासाला मारक वातावरण निर्माण झाले असल्याने रिझर्व्ह बॅंकेच्या उद्याच्या पतधोरण आढाव्यात 0.25 टक्के दरकपात होणे अपेक्षित आहे. तसेच, एप्रिलमधील पुढील पतधोरण आढाव्यातही रिझर्व्ह बॅंकेकडून दरकपात होण्याची शक्‍यता आहे.

सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालातही नोटाबंदीमुळे विकासदर 0.25 ते 0.50 टक्के कमी होईल, असे नमूद करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वित्तीय तुटीचे उद्दिष्ट पुढील आर्थिक वर्षासाठी 3.2 टक्‍क्‍यांवर आणले आहे. यातच बॅंक ऑफ अमेरिकाने व्याजदर वाढीबाबत घेतलेली "जैसे थे' भूमिका याचा परिणाम रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणावर होईल, असे "बॅंक ऑफ अमेरिका मेरील लिंच'ने म्हटले आहे.

Web Title: reduction in interest rates possible due to note ban