जिओसंबधी मुकेश अंबानी उद्या करणार 'या' तीन मोठ्या घोषणा?

वृत्तसंस्था
रविवार, 11 ऑगस्ट 2019

कंपनीकडून काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये बहुप्रतिक्षित जिओ गिगाफायबर सेवा, जिओफोन 3 आणि जिओ गिगा टीव्ही या सेवांबाबत घोषणा केली जाईल असा अंदाज आहे.

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची मुंबईत उद्या 42 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक होणार आहे. या बैठकीत कंपनीकडून काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये बहुप्रतिक्षित जिओ गिगाफायबर सेवा, जिओफोन 3 आणि जिओ गिगा टीव्ही या सेवांबाबत घोषणा केली जाईल असा अंदाज आहे.

जिओ गिगाफायबर सेवा या बहुप्रतिक्षित ब्रॉडबँड सेवेबाबत कंपनीकडून गेल्या वर्षभरापासून देशात अनेक ठिकाणी जिओ गिगाफायबर सेवेची चाचणी सुरु आहे. काही मोजक्या ग्राहकांना या सेवेची जोडणीही देण्यात आलेली आहे. उद्याच्या सभेत या सेवेची अधिकृत घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे. या सेवेसाठीचे प्रतिमाह 600 रुपयांपासून प्लॅन असण्याची शक्यता आहे. यामध्ये प्लॅनमध्ये 50 mbps हायस्पीडसह 100 GB पर्यंत डेटा मिळेल. तसंच जिओ इंटरनेट टीव्ही, लँडलाईन सेवा, व्हिडीओ कॉलिंग यांसारख्या अनेक व्हॅल्यू अॅडेड सेवा देखील मिळतील, असे सांगण्यात येत आहे.

रिलायंस जिओकडून उद्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओ गिगा टीव्हीबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. गिगा फायबर सेवेद्वारेच टीव्ही चॅनलची सेवा पुरवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये जिओकडून पारंपारिक डीटीएच पद्धतीऐवजी आयपीटीव्ही तंत्रज्ञानाचा वापर केला जाण्याचा अंदाज आहे.

कंपनी नवा फीचर फोन जिओ फोन 3 लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा 4G फीचर फोन असण्याची शक्यता असून उद्या हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे. नव्या फीचर फोनसाठी जिओने मीडिया टेकशी भागीदारी केल्याची माहिती आहे. या फोनमध्ये KaiOS ऑपरेटिंग सिस्टिम असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance Jio Expected Big Announcements Like Reliance Jio Gigafiber Jiophone 3 And Jio Gigatv