जिओकडे ग्राहकांची पाठ; 13 टक्केच नोंदणी 

वृत्तसंस्था
बुधवार, 29 मार्च 2017

हॅप्पी न्यू ईअर ऑफरच्या समाप्तीनंतर 1 एप्रिलपासून जिओची नवीन ऑफर येत असून, या सेवांसाठी ग्राहकांना पैसे भरावे लागणार आहेत. "हॅप्पी न्यू ईअर ऑफर' सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांना 99 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. 

मुंबई - रिलायन्स जिओची हॅप्पी न्यू ईअरची मोफत डेटा व कॉलची ऑफर 31 मार्चला संपत असून त्यानंतर प्राथमिक सदस्यता (प्राईम मेंबरशीप) ऑफर स्वीकारून ग्राहकांना जिओची सेवा सुरू ठेवता येणार आहे. मात्र "जिओ'च्या 13 टक्के ग्राहकांनीच जिओच्या प्राईम मेंबरशीपमध्ये उत्सुकता दर्शविली आहे. त्यामुळे मोफत कॉल व डेटाच्या ऑफरनंतर ग्राहक जिओकडे पाठ फिरवणार असे चित्र पहायला मिळत आहे. 

हॅप्पी न्यू ईअर ऑफरच्या समाप्तीनंतर 1 एप्रिलपासून जिओची नवीन ऑफर येत असून, या सेवांसाठी ग्राहकांना पैसे भरावे लागणार आहेत. "हॅप्पी न्यू ईअर ऑफर' सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांना 99 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. 

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार गेल्या चार आठवड्यांत रिलायन्स जिओकडे 2 कोटी नव्या ग्राहकांची नोंद झालेली आहे. रिलायन्स जिओने 170 दिवसांमध्ये 10 कोटी ग्राहकांचा आकडा पार करत उच्चांक गाठला होता. मात्र सध्या प्राईम मेंबरशीपसाठी केवळ 1 कोटी साठ लाख ग्राहकांनीच नोंदणी केल्याचे निदर्शनास आलेले आहे. दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार मोफत डेटा व कॉल ऑफरच्या समाप्तीनंतर जिओचे ग्राहक इतर कंपन्यांची सेवा घेऊ शकतात. जिओच्या ऑफरच्या समाप्तीनंतर एअरटेल, आयडिया, व्होडाफोन, एअरसेल, यूनिनॉर, टेलिनॉर आदी दूरसंचार कंपन्यांमधील "टेरीफ वॉर' संपण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे रिलायन्स व्यतिरिक्त इतर कंपन्यांचे भांडवल पूर्वपदावर येण्यास यामुळे मदत होणार आहे. 

Web Title: Reliance Jio receives poor response, says report; only 13 percent customers sign up for Prime membership