रिलायन्स देणार दीड हजारांत '4G फोन'?

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

या नव्या स्मार्टफोनमध्ये व्हीओएलटीई तंत्रज्ञानासोबतच कंपनीचे विविध अॅप्लिकेशन्स उपलब्ध होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे तंत्रज्ञान कार्यान्वित करण्यासाठी चिपसेट्ससाठी रिलायन्सची चीनमधील स्प्रेडट्रमसोबत बोलणी सुरु आहे.

नवी दिल्ली - मोफत 4G सेवा सादर करीत भारतीय मोबाईल इंटरनेट क्षेत्रात धुमाकुळ घालणाऱ्या रिलायन्स जिओची वाजवी दरात 4G स्मार्टफोन उपलब्ध करुन देण्याची तयारी सुरु आहे. कंपनीतर्फे अवघ्या दीड हजार रुपयांपेक्षा स्वस्त दरात 'व्हीओएलटीई' तंत्रज्ञानावर आधारित फोरजी स्मार्टफोन सादर केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

उद्योजक मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने सप्टेंबर महिन्यात मोफत कॉलिंग आणि मोफत फोर जीबी डेटा देण्याची घोषणा करीत दूरसंचार क्षेत्रात अटीतटीची स्पर्धा निर्माण केली. वाजवी दरात स्मार्टफोन उपलब्ध नसल्याने सध्या भारतातील 65 लोक फीचर फोनचा वापर करतात. आता कंपनीने खरंच एवढ्या स्वस्तात 4G स्मार्टफोन सादर केला, तर कंपनीच्या ग्राहकवर्गात मोठी वाढ होईल, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. सुरुवातीला 999 आणि 1,500 रुपये अशा दोन रेंजमध्ये फोन सादर केले जाण्याची शक्यता आहे.

या नव्या स्मार्टफोनमध्ये व्हीओएलटीई तंत्रज्ञानासोबतच कंपनीचे विविध अॅप्लिकेशन्स उपलब्ध होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे तंत्रज्ञान कार्यान्वित करण्यासाठी चिपसेट्ससाठी रिलायन्सची चीनमधील स्प्रेडट्रमसोबत बोलणी सुरु आहे. याशिवाय, क्वालकॉम आणि मिडियाटेकसोबतदेखील बोलणी सुरु आहे.

Web Title: Reliance Jio: A VoLTE feature phone below Rs 1500