मुकेश अंबानींच्या रिलायन्सने केले मालामाल

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

 रिलायन्सने पुन्हा ओलांडला 8 लाख कोटींच्या बाजारमूल्याचा टप्पा, समभागधारकांनी केली कमाई !

मुंबई: मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजारमूल्याने 8 लाख कोटींचा टप्पा पुन्हा एकदा ओलांडला आहे. काल रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी सौदी अरामको रिलायन्सचा 20 टक्के हिस्सा 5.32 लाख कोटी रुपयांना विकत घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे आज शेअर बाजारात रिलायन्सच्या शेअरने मोठी उसळी घेतली. रिलायन्स शेअर राष्ट्रीय शेअर बाजारात 1,290.05 रुपये प्रति शेअर या पातळीवर व्यवहार करतो आहे. मागील काही सत्रांपासून रिलायन्स शेअरच्या किंमतीत घसरण झाली होती. रिलायन्सच्या शेअरधारकांनी बाजार सुरू झाल्याच्या पहिल्या तासाभरातच 84,151 कोटी रुपयांची कमाई केली. 

रिलायन्सचे बाजारमूल्य 8 लाख 20 हजार 753 कोटी रुपयांवर पोचले आहे. शुक्रवारी शेअर बाजार बंद झाला त्यावेळी रिलायन्सचे बाजारमूल्य 7 लाख 36 हजार 602 कोटी रुपयांवर होते. 23 जुलै 2019ला रिलायन्सचे बाजारमूल्य 8.06 लाख कोटी रुपये होते. त्यानंतर मात्र कंपनीचे बाजारमूल्य 8 लाख कोटींच्या खालीच घसरले होते. 22 फेब्रुवारी 2017 नंतर रिलायन्सच्या शेअरने आतापर्यतची इंट्राडे व्यवहारातील सर्वात मोठी उसळी घेतली आहे. रिलायन्स पुढील 18 महिन्यात कर्जमुक्त करण्याच्या अंबानींच्या घोषणेमुळे रिलायन्सच्या शेअरने उसळी घेतली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance Shares Jump