अर्थचिंतेने ग्रासले

वृत्तसंस्था
सोमवार, 17 डिसेंबर 2018

मुंबई - रोजगार निर्मितीला बसलेली खीळ, देशांतर्गत आर्थिक घडामोडी आणि बदलांनी ग्राहकांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याचा निष्कर्ष रिझर्व्ह बॅंकेच्या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यात इंडियन कंझ्युमर कॉन्फिडन्स इण्डेक्‍समध्ये घट झाली आहे. अर्थव्यवस्थेची मंदीच्या दिशेने वाटचाल सुरू असून, चिंताग्रस्त झालेल्या ग्राहकांनी खर्चाला कात्री लावली आहे.

नुकताच जाहीर करण्यात आलेल्या कंझ्युमर कॉन्फिडन्स इण्डेक्‍स अहवालात ‘आरबीआय’ने  १३ शहरांमधील पाच हजारांहून अधिक ग्राहकांचा आर्थिक परिस्थितीबाबत कौल जाणून घेतला. नोव्हेंबरमध्ये कंझ्युमर कॉन्फिडन्स इण्डेक्‍स ९३.८ पर्यंत खाली आला आहे. सध्याच्या आर्थिक स्थितीबाबत निम्म्याहून अधिक ग्राहकांनी चिंता व्यक्त केली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, इंधन दरवाढ, रुपयाचे अवमूल्यन आदी घडामोडी ग्राहकांवर परिणाम करीत आहेत.  

नव्या रोजगाराबाबत ग्राहक साशंक असले, तरी वर्षभरात रोजगाराची स्थिती सुधारेल, असे या अहवालात म्हटले आहे. सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५४ टक्के ग्राहकांनी पुढील वर्षभरात रोजगार स्थिती सुधारेल, असा आशावाद व्यक्त केला. मात्र, ग्राहकांनी खर्चाला कात्री लावल्याने अर्थव्यस्थेवर परिणाम होण्याची शक्‍यता आरबीआयने व्यक्त केली आहे. जुलैपासून ग्राहकांचे खर्चाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले आहे. बॅंकिंग क्षेत्रातील समस्या, चढे व्याजदर यामुळे सणासुदीतील मागणीवर परिणाम झाला. 

चलन आणि शेअर बाजारातील अनिश्‍चितता आणि कच्च्या तेलाच्या किमतींनी ग्राहकांच्या चिंतेत भर घातली आहे.
- सौम्य कांती घोष, एसबीआयचे मुख्य आर्थिक सल्लागार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reserve bank of India Economic