किरकोळ महागाईचा तीन वर्षांतील नीचांक

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यामुळे ग्राहकांच्या क्रयशक्तीवर परिणाम झाला. बाजारातील दैनंदीन उलाढाल मोठ्या प्रमाणात घटल्याने मागणी घटली. परिणामी महागाईचा पारा उतरल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

नवी दिल्ली : भाजीपाला, डाळी आणि इतर अन्नधान्यांच्या किंमतींमध्ये घसरण झाल्याने जानेवारी महिन्या किरकोळ महागाईचा दर 3.17 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला आहे. गेल्या तीन वर्षांत प्रथमच महागाई दराने नीचांकी पातळी गाठली आहे. डिसेंबर महिन्यात तो 3.41 टक्के होता तर जानेवारी 2016 मध्ये महागाई दर 5.69 टक्के होता.

सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भाजीपाल्याची किंमतींमधील घसरण कायम आहे. भाजीपाला महागाईचा दर उणे 15.62 टक्के आहे. डिसेंबरमध्ये भाजीपाला महागाई दर उणे 14.59 टक्के होता. डाळीवर्गीय अन्नधांन्यांचा दर ही उणे 6.62 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला आहे. फळांच्या किंमतींमधील महागाई दर 5.81 टक्के असून इंधन आणि ऊर्जा महागाई दर 3.42 टक्के आहे.

मटण आणि मत्स उत्पादनांची महागाई 2.98 टक्के आहे. ग्राहकमूल्यावरआधारीत अन्नधान्य महागाईचा दर 0.53 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला आहे. डिसेंबरमध्ये तो 1.37 टक्के होता. केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यामुळे ग्राहकांच्या क्रयशक्तीवर परिणाम झाला. बाजारातील दैनंदीन उलाढाल मोठ्या प्रमाणात घटल्याने मागणी घटली. परिणामी महागाईचा पारा उतरल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Web Title: retail inflation rate lowest in 3 years