अर्थसंकल्पाचा उतारा आणि शेअर बाजारात 5 लाख कोटींचा खेळखंडोबा...

अर्थसंकल्पाचा उतारा आणि शेअर बाजारात 5 लाख कोटींचा खेळखंडोबा...

मुंबई: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी फक्त दोनच सत्रांमध्ये तब्बल 5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजारमूल्य गमावले आहे. शुक्रवारी, 5 जुलैला देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर सेन्सेक्समध्ये घसरण सुरू झाली आहे. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज 792.87 अंशांनी घसरून 38,720.57 अंशांच्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 252.55 अंशांनी घसरून 11,558.60 अंशांच्या पातळीवर बंद झाला. नव्या अर्थसंकल्पाला शेअर बाजाराने नकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुंबई शेअर बाजारात नोंदणी झालेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य शुक्रवारी 153.58 लाख कोटी रुपये होते. ते आज सकाळच्या सत्रात घसरून 148.43 लाख कोटी रुपयांवर येऊन पोचले आहे. शुक्रवारी बाजारात 1 टक्क्यांची घसरण झाली होती. आज मात्र सेन्सेक्स 792 अंशांनी घसरला आहे. तर निफ्टीमध्ये 252 अंशांची घसरण झाली आहे. अर्थसंकल्पात असलेल्या मोठ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. तरीही शेअर बाजाराने शुक्रवारी फारशी घसरण नोंदवली नाही. मात्र फोरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटवरील दिर्घकालीन परतावा करात वाढ करण्यात आली आहे त्याचा शेअर बाजारावर विपरित परिणाम झाला आहे. मोठ्या घसरणीमागचे आणखी एक कारण म्हणजे बायबॅक कर आणि नोंदणीकृत कंपन्यांमधील सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा हिस्सा 35 टक्क्यांवर वाढवण्याचा सरकारचा निर्णय याचा शेअर बाजारावर मोठा नकारात्मक परिणाम झाला आहे. अतिश्रीमंतावर लावण्यात आलेल्या अतिरिक्त कराचासुद्धा जवळपास 2,000 परकी फंडांवर परिणाम होऊ शकतो. 

शेअर बाजारातील महत्त्वाच्या कंपन्या, एचडीएफसी बॅंक, एल अॅंड टी, आयसीआयसीआय बॅंक, एसबीआय, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बॅंक आणि एक्सिस बॅंक यांच्यामुळेच एकत्रितरित्या सेन्सेक्समध्ये 400 अंशांची घसरण झाली. शेअरची विक्री इतकी मोठ्या प्रमाणावर झाली की हिरो मोटोकॉर्प, पीएनबी, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि दिलीप बिल्डकॉन यांच्या शेअरच्या किंमतीत वर्षभरातील सर्वात मोठी घसरण झाली आहे. तर बजाज फायनान्स आणि बॅंक ऑफ इंडियाच्या शेअरच्या किंमतीत वर्षभरातील दुसरी मोठी घसरण झाली आहे.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदी, बड्या कंपन्यांच्या शेअरचे बाजारमूल्य यांचाही शेअर बाजारावर दबाव होता. सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे परकी संस्थात्मक गुंतवणूकदार शेअरची विक्री करत असल्याचे आढळून आले. स्मॉलकॅप प्रकारातील शेअरचीही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. केआरबीएल (12 टक्के घट), माईंडट्री (11 टक्के घट), पीएनबी (10.50 टक्के घट), जेपी असोसिएट्स (9.70 टक्के घट), बॅंक ऑफ इंडिया (7.51 टक्के घट) यांच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. तर येस बॅंक, डॉ. लाल पॅथ लॅब्स, पी सी ज्वेलर्स, एचसीएल टेक्नॉलॉजीस आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या शेअर किंमतीमध्ये मात्र वाढ झाली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com