रुपयाचे अवमूल्यन महागाई वाढविणार 

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 मे 2018

मुंबई  - चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये अवमूल्यन होत असल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. रुपयाचे मूल्य 67 च्या खाली गेले असून यामुळे आयातीच्या बिलात मोठी वाढ होणार आहे. रुपयाचे अवमूल्यन न थांबल्यास देशांतर्गत महागाईचा भडका उडण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे. 

मुंबई  - चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये अवमूल्यन होत असल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. रुपयाचे मूल्य 67 च्या खाली गेले असून यामुळे आयातीच्या बिलात मोठी वाढ होणार आहे. रुपयाचे अवमूल्यन न थांबल्यास देशांतर्गत महागाईचा भडका उडण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे. 

चलन बाजारात रुपयाने सोमवारी 67 ची पातळी तोडली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयात 25 पैशांचे अवमूल्यन झाले आणि तो 67.13 पर्यंत घसरला. परकी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) शेअर बाजारातील पैसा काढून घेण्याचा सपाटा लावल्यामुळे डॉलरची मागणी वाढली असून रुपयाला झळ बसत आहे. "एफपीआय'ने शेअरमधून पैसे काढल्याने इक्विटी, बॉंड आणि चलन बाजाराला फटका बसला आहे. 16 एप्रिल ते चार मे दरम्यान 13 सत्रांमध्ये "एफपीआय'ने बाजारातून तब्बल पाच हजार 819 कोटी रुपये काढून घेतले आहेत. फेब्रुवारी 2017 नंतर रुपयाने 67 ची पातळी ओलांडली आहे. 

जागतिक बाजारात खनिज तेलाच्या वाढत्या किमतीमुळे सरकारचा आर्थिक समतोल बिघडण्याची शक्‍यता आहे. सरकारला खनिज तेलाच्या आयातीसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे देशांतर्गत महागाई वाढण्याची शक्‍यता आहे. रुपयाचे अवमूल्यन रोखण्यासाठी उपाययोजना न केल्यास तो 69 पर्यंत जाईल, अशी भीती व्यक्‍त करण्यात आली आहे. 

इंधन भडका 
जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. जून 2017 पासून खनिज तेलाच्या किमतींमध्ये तब्बल 65 टक्‍क्‍यांची वाढ झाली होती. खनिज तेलाच्या किमतींनी प्रतिबॅरल 70 डॉलरची पातळी ओलांडली आहे. ज्यामुळे इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोलचा दर 80 रुपये लिटरच्या पुढे आणि डिझेलच्या दराने सत्तरी गाठली आहे. रुपयाचे अवमूल्यन आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमुळे इंधनाचे दर भडकतील, असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. 

Web Title: Rupee depreciation will increase inflation