एनपीएस’चा विचार केलाय? (पैशाच्या गोष्टी)

Rushabha parakh writes about NPS
Rushabha parakh writes about NPS

चालू आर्थिक वर्ष संपण्यास जेमतेम दीड महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. सध्या करबचतीच्या गुंतवणुकीची, विशेषतः "नॅशनल पेन्शन सिस्टीम'ची (एनपीएस) चर्चा जोरात सुरू आहे. त्यातच या योजनेत मिळणाऱ्या अतिरिक्त करसवलतीमुळे त्याविषयीची उत्सुकता बऱ्याच ठिकाणी दिसत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात या संदर्भात काही बदलही करण्यात आले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर आज या योजनेविषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

"एनपीएस' ही एक ऐच्छिक योजना असून, लोकांना निवृत्तीनंतरची तरतूद (पेन्शन) करण्यासाठी बचत करण्याची सवय लागावी म्हणून ही योजना सरकारने सुरू केलेली आहे. राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या अंतर्गत, तुमची बचत ही "पीएफआरडीए'ने मान्यता दिलेल्या गुंतवणुकीच्या मार्गदर्शनानुसार व्यावसायिक फंड व्यवस्थापकांच्या देखरेखीखाली पेन्शन योजनेत गुंतविली जाते. तुमचे पैसे शेअर्स, सरकारी रोखे, कॉर्पोरेट डिबेंचर यांमध्ये विभागून गुंतविले जातात. गुंतवणुकीच्या वाढीसाठी पेन्शन फंड मॅनेजरचे पर्यायसुद्धा दिले जातात आणि गुंतवणुकीच्या एका पर्यायावरून दुसऱ्या पर्यायात बदल करून घेता येऊ शकतो. देशातील अन्य पेन्शन योजनेच्या तुलनेत "एनपीएस'च्या खात्याचा देखभालीचा खर्च (चार्जेस) कमी आहे. केंद्र सरकारने सुरू केलेली आणि "पीएफआरडी'च्या अंतर्गत यावर देखभाल व देखरेख होत असल्याने सुरक्षितपणे निवृत्ती निधी तयार होतो.

कलम 80 सीच्या अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करवजावटीस पात्र असते. यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ), सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), आयुर्विम्याचा हप्ता, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एनएससी), मुलांची ट्युशन फी आणि गृहकर्ज मुद्दल असे विविध पर्याय येतात. कलम 80 सीसीडी (1बी) अंतर्गत "एनपीएस'मधील रु. 50 हजारांच्या गुंतवणुकीची रक्कम अतिरिक्त करवजावटीस पात्र असते. ही रक्कम कलम 80 सीच्या मर्यादेव्यतिरिक्‍त आहे, म्हणजेच कलम 80 सी अंतर्गत रु. दीड लाखापर्यंत वजावट मिळू शकते आणि "एनपीएस'मधील गुंतवणुकीवर आणखी रु. 50 हजारांची अतिरिक्त वजावट मिळू शकेल.

"एनपीएस' ही दीर्घकाळाची योजना असून, तुम्हाला विशिष्ट अटींनुसार पैसे मिळतात. 1) वय वर्षे 60 पूर्ण झाल्यावर मुदतपूर्तीच्या वेळी गुंतवणुकीच्या (पेन्शन निधी) किमान 40 टक्के रक्कम जीवनभराच्या पेन्शनखरेदीसाठी गुंतवावी लागते आणि बाकीची रक्कम एकरकमी काढू शकता. तुमच्या गुंतवणुकीतून वाढत जाणाऱ्या निधीच्या प्रमाणात तुम्हाला साठीनंतर जीवनभर पेन्शन मिळू शकते. पण त्याची रक्कम आताच सांगता येत नाही. बाजारावर अवलंबून असलेल्या या फंडाच्या कामगिरीवर परतावा अवलंबून राहील. नव्या प्रस्तावानुसार, कलम 10 (12बी) नुसार, कर्मचाऱ्याच्या योगदानापैकी 25 टक्‍क्‍यांपर्यंतचा निधी अंशतः काढण्याची मुभा मिळण्याची शक्‍यता आहे. 2) कोणत्याही कारणाने खातेदाराचा मृत्यू झाल्यास वारसाला (नॉमिनी) "एनपीएस'मधील 100 टक्के रक्कम एकरकमी मिळण्याची सोय असते किंवा नॉमिनीला "एनपीएस' सुरू ठेवायची असेल तर "केवायसी' प्रक्रिया पूर्ण करून त्याला "एनपीएस'चे सदस्यत्व घेता येते. अर्थसंकल्पातील नव्या प्रस्तावानुसार, स्वयंरोजगारीत व्यक्तींच्या ढोबळ उत्पन्नाच्या 20 टक्‍क्‍यांपर्यंतची रक्कम आता करपात्र उत्पन्नातून वजावटीस पात्र राहणार आहे.

करबचतीबरोबरच निवृत्तीनंतरचीही तरतूद करणाऱ्या "एनपीएस'विषयी अनेक नागरिक अनभिज्ञ असल्याचे लक्षात येते. निवडक बॅंकांबरोबरच स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कार्यालयांमध्येही हे खाते सुरू करता येते. पण अनेक बॅंकांमध्येही त्याबाबत फारशी माहिती नसल्याचे जाणवते. त्यामुळे या योजनेबाबत आपणच सजग राहून त्यात सहभागी झाले पाहिजे व त्याचा लाभ करून घेतला पाहिजे.
(लेखक चार्टर्ड अकाउंटंट आणि "मनी प्लांट कन्सल्टन्सी'चे प्रमुख आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com