रत्नागिरी रिफायनरीमध्ये होणार तीन लाख कोटींची गुंतवणूक

वृत्तसंस्था
बुधवार, 11 एप्रिल 2018

सौदी अरेबियाची अरामको कंपनी लवकरच महाराष्ट्रातील रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये  मोठी गुंतवणूक करणार आहे. यामध्ये 50 टक्क्यांची भागीदारी असणार असून सुमारे तीन लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली: सौदी अरेबियाची अरामको कंपनी लवकरच महाराष्ट्रातील रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये  मोठी गुंतवणूक करणार आहे. यामध्ये 50 टक्क्यांची भागीदारी असणार असून सुमारे तीन लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांच्या उपस्थितीत  या सामंजस्य करारावर आज (बुधवार) नवी दिल्लीत सह्या झाल्या आहेत. भारतीय तेल विपणन कंपन्या इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियन व हिंदुस्तान पेट्रोलियम यांचा देखील यात समावेश असणार असून हा संयुक्त प्रकल्प रत्नागिरीजवळील नाणार येथे उभारण्यात येणार आहे. 

भारत जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. परिणामी सौदी अरेबियाच्या खनिज तेलासाठी भारत हा मोठा ग्राहक असून भविष्यातील धोरणात्मक गुंतवणूक म्हणून सौदी अरेबियाने भारतासोबत हा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय भारत एक मोठी बाजारपेठ असल्याने सौदी अरेबियाने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे आहे 3 लाख कोटी ($ 44 अब्ज) रुपयांचा खर्च अपेक्षित असून रिफायनरीमध्ये प्रति दिन 12 लाख बॅरल्स कच्च्या तेलावर प्रक्रिया करता येणार आहे. म्हणजेच प्रतिवर्षी 6 कोटी टन तेलावर प्रक्रिया होणार आहे. 

 भारताला सौदी अरेबियाच्या मदतीने कमी खर्चामध्ये इंधनाची उपलब्धता होणार असून भारताच्याअर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ते लाभदायक ठरणार आहे.  इंधनाच्या बाबतीत भारत हा संवेदनशील देश असून कच्च्या तेलाची किंमत 50 डॉलर प्रति पिंप असल्यास ते भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आश्वासक असेल असे मत यावेळी प्रधान यांनी व्यक्त केले. 

Web Title: Saudi Aramco inks MoU for ₹3-lakh crore mega refinery at Ratnagiri