esakal | अर्थभान : ‘सिल्व्हर ईटीएफ’; गुंतवणुकीची चांदी
sakal

बोलून बातमी शोधा

अर्थभान

अर्थभान : ‘सिल्व्हर ईटीएफ’; गुंतवणुकीची चांदी

sakal_logo
By
सुधाकर कुलकर्णी

सुमारे १५ दिवसांपूर्वी ‘सेबी’ने ‘सिल्व्हर ईटीएफ’ भांडवल बाजारात आणण्यास अनुमती दिली आहे. यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारास आता चांदीमध्येदेखील सहजगत्या गुंतवणूक करता येणार आहे. त्यासाठी आपण ‘ईटीएफ’ म्हणजे काय ते आधी समजून घेऊ.

एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) हा म्युचुअल फंडाच्या इंडेक्स फंडासारखा एक पॅसिव्ह गुंतवणुकीचा प्रकार आहे. यात जमा झालेल्या रकमेची गुंतवणूक शेअर (इंडेक्स), कर्जरोखे (बॉँड), सोने (गोल्ड) यासारख्या ‘अंडरलाईंग ॲसेट’मध्ये (मुलभूत मालमत्ता) केली जाते. गुंतवणुकीचे बाजारमूल्य हे ‘अंडरलाईंग ॲसेट’च्या बाजारातील बदलणाऱ्या भावानुसार कमी-जास्त होत असते. ‘ईटीएफ’ची रचना म्युचुअल फंडासारखीच असते. यात गुंतवणूकदारास गुंतवणूक केलेल्या रकमेचे युनिट हे बाजारभावाप्रमाणे (एनएव्ही) दिले जातात.

‘गोल्ड’प्रमाणेचच ‘सिल्व्हर ईटीएफ’ बाजारात आणावेत, अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून होत होती आणि त्यामुळेच आता ‘सेबी’ने नुकतीच त्यास अनुमती दिली आहे. त्यानुसार आता चांदीतसुद्धा ‘ईटीएफ’मार्फत गुंतवणूक करता येईल. एक युनिट म्हणजे एक ग्रॅम चांदी असणार आहे.

विशेष म्हणजे ‘ईटीएफ’च्या युनिटची स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणी (लिस्टिंग) होणार असल्याने याची खरेदी-विक्री शेअरप्रमाणे स्टॉक एक्स्चेंजवर ब्रोकरमार्फत करता येते. ‘सिल्व्हर ईटीएफ’मध्ये ‘अंडरलाईंग ॲसेट’ ही चांदी असल्याने ‘सिल्व्हर ईटीएफ’च्या युनिटचा भाव हा चांदीच्या दिवसभरातील बाजारातील भावानुसार कमी-जास्त होत राहील.

थोडक्यात, ‘सिल्व्हर ईटीएफ’ हा चांदीच्या भावाचा मागोवा घेत राहील. यामुळे गुंतवणूकदार अल्पावधीत सुद्धा योग्य ती ‘पोझिशन’ घेऊन नफा कमावू शकतो. चांदीला दागिन्यांबरोबरच औद्योगिक मागणी असल्याने चांदीच्या भावातील चढ-उतार सोन्याच्या तुलनेने जास्त असतात. ‘सिल्व्हर ईटीएफ’ आल्याने त्याचा फायदा ‘ट्रेडर’लासुद्धा घेता येईल.

‘सिल्व्हर ईटीएफ’चे फायदे...

  • स्टॉक एक्स्चेंजवर खरेदी-विक्री होणार असल्याने आपण केलेली गुंतवणूक लिक्विड (तरल) असेल.

  • चांदीच्या शुद्धतेबाबत शंका असणार नाही; तसेच साठवणुकीची समस्या असणार नाही.

  • व्यवहार कमी खर्चिक व पारदर्शी असेल.

  • चोरीची शक्यता असणार नाही. कमी पैशातसुद्धा गुंतवणूक करता येईल.

  • गुंतवणूकदारास आणखी ‘डायव्हर्सिफिकेशन’ करता येईल.

    थोडक्यात असे म्हणता येईल, की ज्या गुंतवणूकदारास चांदीत गुंतवणूक करायची असेल, त्याच्यासाठी हा अगदी सोपा पर्याय निर्माण झाला आहे.

(लेखक सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर- सीएफपी आहेत)

loading image
go to top