बिगर वित्तीय संस्थांना 'क्‍यूआयबी' दर्जा - सेबी

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

सेबीचे नवे प्रमुख अजय त्यागी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची पहिली बैठक बुधवारी (ता.26) पार पडली. शेअर बाजारातील व्यवहार पारदर्शक करण्याच्या दृष्टीने सेबीने शेअर दलाल आणि क्‍लीअरिंग मेंबर संदर्भातील नियमांमध्ये सुधारणा केली आहे.

मुंबई - शेअर बाजार आणि वायदे बाजारात व्यवहार करण्यासाठी दलालांना एकत्रित परवाना देण्याचा महत्त्वाचा निर्णय भांडवली बाजार नियंत्रक मंडळाने (सेबी) घेतला आहे.

याशिवाय बिगर बॅंक वित्त संस्थांना पात्र संस्थात्मक खरेदीदार (क्वॉलिफाइड इन्स्टिट्यूशन बायर्स अर्थात क्‍यूआयबी) हा दर्जा दिला आहे. यामुळे बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांना प्रारंभिक समभाग विक्री योजनेत (आयपीओ) सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

सेबीचे नवे प्रमुख अजय त्यागी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची पहिली बैठक बुधवारी (ता.26) पार पडली. शेअर बाजारातील व्यवहार पारदर्शक करण्याच्या दृष्टीने सेबीने शेअर दलाल आणि क्‍लीअरिंग मेंबर संदर्भातील नियमांमध्ये सुधारणा केली आहे. यात शेअर आणि वायदे बाजारात व्यवहार करण्यासाठी दलालांना एकत्रित परवाना देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ज्या दलालांकडे शेअर बाजार आणि वायदे बाजारात व्यवहार करण्याचा परवाना आहे, अशा ठिकाणी गुंतवणूकदारांना शेअर्स आणि इक्विटीतील गुंतवणुकीचा एकच सामायिक करार मिळणार आहे. 

सर्वच बाजारांसाठी सामायिक नोंदणी क्रमांक मिळेल. 500 कोटींहून अधिक नेटवर्थ असलेल्या बिगर बॅंकिंग वित्त संस्थांना आयपीओत सहभागी होता येईल. त्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांवरचे अवलंबित्व कमी होऊन स्थानिक गुंतवणूकदारांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे "सेबी'ने म्हटले आहे. याशिवाय बिगर बॅंकींग वित्तीय कंपन्यांना (एनबीएफसी) म्युच्युअल फंड कंपन्या आणि विमा कंपन्यांच्या बरोबरीने गुंतवणुकीची संधी मिळेल. अनिवासी भारतीयांसाठीही गुंतवणुकीची प्रक्रिया सोपी केली आहे. परदेशी गुंतवणूदारांसाठी पी-नोट्‌समधील गुंतवणुकीकरिता समायिक नोंदणी फॉर्म उपलब्ध केला आहे. प्रेफरन्स शेअर्स वाटपातील बॅंकांसाठीची नियमावली शिथिल करण्यात आली आहे. 

Web Title: Sebi meet: NBFCs to get QIB status; unified licence for brokers