गुंतवणूकदारांना '468 व्होल्ट'चा झटका

पीटीआय
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

सेन्सेक्‍समध्ये घसरण; दोन लाख कोटींचा चुराडा

सेन्सेक्‍समध्ये घसरण; दोन लाख कोटींचा चुराडा
मुंबई - अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्षाची धग आज भारतीय शेअर बाजारांना जाणवली. रुपयातील अवमूल्यन आणि "मुडीज'चा नकारात्मक मानांकनाचा इशारा, देशांतर्गत अस्थिरता या घडामोडींना धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता.10) तुफान विक्री केल्याने सेन्सेक्‍सने तब्बल 500 अंशांची गटांगळी खाल्ली. दिवसअखेर तो 468 अंशांच्या घसरणीसह 37 हजार 922 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 151 अंशांची घट झाली आणि तो 11 हजार 438 अंशांवर विसावला. या पडझडीत गुंतवणूकदारांचे जवळपास दोन लाख कोटींचे नुकसान झाले.

ऑटो, मेटल, एनर्जी, एफएमसीजी आदी क्षेत्रांमध्ये जोरदार विक्री दिसून आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी मालावर आणखी शुल्क आकारण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीनमधील वाद विकोपाला गेल्यास त्याचे परिणाम जागतिक बाजारावर उमटतील. यामुळे खनिज तेलाच्या किमतींचा भडका उडण्याची शक्‍यता आहे. त्यातच चलन बाजारात रुपयाने डॉलरसमोर शरणागती पत्कारली आहे. आज रुपयाने 72.67 चा नीचांक गाठला. यामुळे वित्तीय तूट वाढण्याची शक्‍यता बळावली आहे. या सर्व घडामोडींनी धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सकाळपासून विक्रीचा सपाटा लावला. मुंबई शेअर बाजारात आणि राष्ट्रीय शेअर बाजारात विक्रीचा ट्रेंड दिसून आला. यामुळे दिवसअखेर दोन्ही निर्देशांकांनी तीन आठवड्यांचा नीचांक नोंदवला.

गेल्या सहा महिन्यांत दुसऱ्यांना सेन्सेक्‍स आणि निफ्टीत मोठी घसरण पाहायला मिळाली. यापूर्वी 16 मार्च रोजी सेन्सेक्‍सने एका सत्रात 509 अंश गमावले होते. आजच्या सत्रात सन फार्माचा शेअर सर्वाधिक आपटला. त्याखालोखाल एचडीएफसी, एचएडीएफसी बॅंक, एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोल इंडिया, वेदांता, इंड्‌सइंड बॅंक, ओएनजीसी, बजाज ऑटो, कोटक महिंद्रा बॅंक, पॉवरग्रीड, एनटीपीसी, टाटा मोटर्स आदी महत्त्वाचे शेअर घसरणीसह बंद झाले. ऍक्‍सिस बॅंक, विप्रो, टीसीएस, येस बॅंक या शेअर्सला मात्र मागणी होती. मिडकॅप शेअरच्या निर्देशांकात 1.68 टक्के आणि स्मॉलकॅप शेअर निर्देशांकात 1 टक्का घसरण झाली.

आज रुपयाने नवा नीचांक गाठला. अमेरिका आणि चीनमधील वाढता व्यापारी संघर्ष खनिज तेलाच्या किमती वाढवण्यास कारणीभूत ठरेल. चलन अवमूल्यनाने खनिज तेल आयात आणखी खर्चिक बनणार असून, तूट वाढेल. यामुळे गुंतवणूकदारांनी विक्री करून पैसे काढण्याला प्राधान्य दिले.
- विनोद नायर, मुख्य विश्‍लेषक जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस

घसरणीची कारणे
- रुपयातील अवमूल्यन
- देशांतर्गत आणि जागतिक स्तरावरील निराशेचे वातावरण
- अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्ष शिगेला
- खनिज तेलाची महागाई
- बॉंड यिल्डचा उच्चांकी दर

निर्णायक आकडेवारी
- निफ्टी मंचावरील 50 पैकी 42 शेअर घसरणीसह बंद
- पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) चालू खात्यातील तूट 15.8 अब्ज डॉलर
- 2018 या वर्षात रुपयात 13 टक्के अवमूल्यन

दोन लाख कोटींचे नुकसान
आजच्या सत्रात गुंतवणूकदारांची मालमत्ता तब्बल 1.96 लाख कोटींनी कमी झाली. मुंबई शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 157.40 लाख कोटींवरून 155.44 लाख कोटींपर्यंत कमी झाले.

जागतिक शेअर बाजारांवर दबाव
आशियातील जपानचा शेअर बाजार वगळता सर्वच प्रमुख शेअर निर्देशांकात घसरण झाली. हॅंगसेंग 1 टक्का, शांघाई कॉम्पोझिट इंडेक्‍स 0.98 टक्के घसरण झाली. जपानच्या निक्केईमध्ये 0.12 टक्‍क्‍यांची किरकोळ वाढ झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex Decrease Investor loss