एक लाख कोटी रुपये पाण्यात !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

सेन्सेक्‍समध्ये ३४४ अंशांची घसरण; गुंतवणूकदार हवालदिल
मुंबई - शेअर बाजारातील अस्थिरतेने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. जागतिक बाजारातील घडामोडींनी गुरुवारी शेअर बाजाराला पुन्हा एकदा झळ बसली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३४४ अंशांनी घसरून ३३ हजार ६९० अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ९९.८५ अंशांची घट होऊन १० हजार १२४ अंशांच्या पातळीवर बंद झाला. आज झालेल्या पडझडीने गुंतवणूकदारांचे सुमारे एक लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. 

मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर ३० पैकी २३ समभाग घसरणीसह बंद झाले. यात भारती एअरटेलच्या समभागामध्ये सर्वाधिक ६ टक्‍क्‍यांची घट झाली. त्याखालोखाल वेदांता, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट, येस बॅंक, एचडीएफसी, विप्रो आदी समभाग घसरले. कोल इंडिया, कोटक महिंद्रा बॅंक, एशियन पेंट्‌स, बजाज ऑटो, टीसीएस हे समभाग तेजीसह बंद झाले. बीएसईच्या सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १.१७ लाख कोटींनी कमी झाले. 

तीनशे समभाग नीचांकी पातळीवर 
शेअर बाजारातीळ तब्बल ३०० समभागांनी आज वर्षभरातील नीचांकी स्तर गाठला. अमेरिका-चीन व्यापारी संघर्ष, सौदी अरेबियातील खनिज तेलाबाबतची अनिश्‍चितता, चलन बाजारातील रुपयाचे अवमूल्यन आणि देशातील राजकीय घडामोडींनी शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. याचे पडसाद सकाळपासून बाजारात उमटले. वायदेपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य देत नफावसुली केली.

बुधवारी अमेरिकन शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली होती. इन्फीबीम अव्हेन्यू १८ टक्के, डीश टीव्ही १७ टक्के, एमसीएक्‍स १४ टक्‍क्‍यांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर ३०० समभाग वर्षभराच्या नीचांकावर आले. यात आंध्र बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, बीईएमएल, भारत फोर्ज, सिएट, ग्रासिम आदी समभागांचे मूल्य वर्षभराच्या नीचांकावर आले.

रुपया डगमगला
चलन बाजारात रुपयाचे मूल्य ११ पैशांनी घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया ११ पैशांच्या अवमूल्यनासह ७३.२७ वर बंद झाला. परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक काढून घेण्यात येत असल्याने डॉलरची मागणी वाढली असल्याचे चलन बाजारातील विश्‍लेषकांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex Decrease Loss