सेन्सेक्‍सची घसरगुंडी कायम 

सेन्सेक्‍सची घसरगुंडी कायम 

मुंबई  - "ऍडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू'मुळे (एजीआर) दूरसंचार आणि वित्तीय कंपन्यांच्या समभागांना फटका बसल्याने शेअर बाजारातील घसरणीचे वारे मंगळवारी सलग चौथ्या सत्रात कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 161 अंशांच्या घसरणीसह 40 हजार 894 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 53 अंशांची घसरण होऊन 11 हजार 992 अंशांवर स्थिरावला. 

शेअर बाजारात आज सकाळपासूनच घसरणीचे वातावरण होते. सेन्सेक्‍समध्ये सकाळपासून सुरू असलेली घसरण बाजार बंद होण्याआधी काही काळ थांबली. यामुळे सेन्सेक्‍स काही प्रमाणात सावरला. अखेर मागील सत्राच्या तुलनेत 161 अंशांची घसरण होऊन तो 40 हजार 894 अंशांवर बंद झाला. मागील चार सत्रांत सेन्सेक्‍समध्ये 444 अंशांची घसरण झाली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांकडून "एजीआर'ची वसुली करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मुभा सरकारला दिली आहे. यामुळे व्होडाफोन आयडियाचा समभाग आज दिवसभरात 16 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक घसरला होता. आशियाई देशांतील चीनवगळता इतर सर्व शेअर बाजारांमध्ये आज घसरणीचे वातावरण होते. कोरोनोविषाणूच्या संसर्गामुळे वाढणारा मृत्यूचा आकडा आणि आर्थिक घसरण यामुळे जगभरातील गुंतवणूकदार सध्या चिंतेत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेवरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

एअरटेलच्या समभागात घसरण 
सेन्सेक्‍सच्या मंचावर आज भारती एअरटेलच्या समभागात सर्वाधिक 3 टक्के घसरण झाली. त्यापाठोपाठ इंड्‌सइंड बॅंक, मारुती सुझुकी, हिरो मोटोकॉर्प आणि टाटा स्टील या कंपन्यांच्या समभागात घसरण झाली. दुसरीकडे एसबीआय, इन्फोसिस, पॉवरग्रीड, टेक महिंद्रा आणि टीसीएस या कंपन्यांच्या समभागात वाढ नोंदविण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com