सेन्सेक्स आणि निफ्टीचे कमबॅक!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

आज मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने कालचाच ट्रेंड कायम ठेवत आणखी उसळी घेतली

मुंबई: आज मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने कालचाच ट्रेंड कायम ठेवत आणखी उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 254.55 अंशांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 77.2 अंशांनी वधारला. दिवसअखेर सेन्सेक्स 37581.91 अंशांच्या पातळीवर तर निफ्टी 11109.65 अंशांवर बंद झाला. 

केंद्र सरकार परकी फोर्टफोलिओ गुंतवणूकदारांवर लावलेल्या प्राप्तिकर अधिभाराच्या संदर्भात घेणार असलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बाजाराने उसळी घेतली. त्यातच मंदीत सापडलेल्या ऑटोमोबाईल क्षेत्राच्या संदर्भात आणि रिअर इस्टेट क्षेत्राला उभारणी देण्यासाठी, जीएसटी कर कमी करण्याच्या संदर्भात सरकार जीएसटी कौन्सिलशी चर्चा करू शकते या शक्यतेने बाजारात चांगलीच तेजी आली. 

ऑटोमोबाईल आणि बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत वाढ झालेली दिसून आली. मारुती सुझुकी, वेदांता, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी बॅंक यांच्या शेअरच्या किंमतीत वाढ झाली. तर येस बॅंक, टेक महिंद्रा, टाटा स्टील आणि आयटीसी या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. धातू, आयटी, औषध निर्मिती आणि सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका यांच्या शेअरच्या किंमतीत घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरून 70.80 रुपये प्रति डॉलरवर पोचले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex ends 255 points up