शेअर बाजारात पुन्हा मंदीचे वारे

वृत्तसंस्था
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

सेन्सेक्‍स 503 अंशांनी गडगडला; व्यापार युद्धाचाही फटका 

मुंबई ः जागतिक पातळीवरील मंदीचे वारे आणि व्यापार युद्धाची तीव्रता वाढण्याची भीती याचा फटका बुधवारी शेअर बाजाराला बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 503 अंशांनी गडगडून 38 हजार 593 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 148 अंशांची घसरण होऊन 11 हजार 440 अंशांवर बंद झाला. 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची चौकशी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचे प्रतिस्पर्धी उमेदवार जो बिडेन यांच्याविरोधात परकी सत्तांची मदत घेऊन अध्यक्षपदासाठी घेतलेल्या शपथेचा भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यामुळे अमेरिकेत राजकीय अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. अमेरिकेतील राजकीय अनिश्‍चितता, अमेरिका-चीन व्यापार युद्ध, जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी यामुळे आज गुंतवणूकदारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले. 
सेन्सेक्‍सच्या मंचावर आज एसबीआय, टाटा मोटर्स, मारुती, येस बॅंक, एम अँड एम, एचडीएफसी, एचडीएफसी बॅंक, आयटीसी, वेदांता, हिरो मोटोकॉर्प, टाटा स्टील आणि एल अँड टी यांच्या समभागात 7.37 टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली. याच वेळी पॉवरग्रीड, टीसीएस, एनटीपीसी, एचसीएल टेक, टेक महिंद्रा आणि आरआयएल यांच्या समभागात 4.39 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ नोंदविण्यात आली. 

जागतिक पातळीवर घसरण 
जागतिक पातळीवर आज घसरणीचे वारे दिसून आले. आशियातील हॅंगसेंग, शांघाय कम्पोझिट इंडेक्‍स, निक्केई आणि कोस्पी या निर्देशांकात घसरण नोंदविण्यात आली. युरोपमधील शेअर बाजारांमध्ये आजच्या सत्राच्या सुरवातीला घसरणीचे चित्र होते. 

भारताच्या विकासदराचा अंदाज कमी 
एशियन डेव्हलपमेंट बॅंकेने (एडीबी) भारताच्या विकासदराचा अंदाज चालू आर्थिक वर्षासाठी कमी करून 6.5 टक्‍क्‍यांवर आणला आहे. यामुळे आर्थिक मंदीचे चित्र अधिक गडद झाल्याचे मानले जात आहे. याचबरोबर दक्षिण आशियातील विकासदराचा अंदाजही "एडीबी'ने कमी केला आहे. दक्षिण आशियाचा विकासदर 2019 मध्ये 6.2 टक्के आणि 2020 मध्ये 6.7 टक्के राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex Ends 504 Points Lower Nifty Settles Below 11450