राजकीय अनिश्चितता व जागतिक घडामोडींमुळे शेअर बाजारात चिंतेचे सावट 

वृत्तसंस्था
सोमवार, 19 मार्च 2018

मोदी सरकारवरील अविश्वास ठराव, व्यापार युध्याच्या घडामोडी आणि अमेरिकेतील अपेक्षित वाढते व्याजदर या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून सेन्सेक्समध्ये घसरण झाली

मुंबई: मोदी सरकारवरील अविश्वास ठराव, व्यापार युध्याच्या घडामोडी आणि अमेरिकेतील अपेक्षित वाढते व्याजदर या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून सेन्सेक्समध्ये घसरण झाली. अखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 252 अंशांच्या घसरणीसह 32 हजार 923 अंशांवर व्यवहार करत स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निदेशांक निफ्टी 10 हजार 094 अंशांवर व्यवहार करत बंद झाला. निफ्टीमध्ये 100 अंशांची घसरण झाली. 

गेल्या आठवड्यात लोकसभा पोटनिवडणुकीत झालेला पराभव आणि तेलगू देसम पक्षाने काढलेला पाठिंबा इत्यादी घडामोडींमुळे राजकीय अनिश्चिततेचे परिणाम शेअर बाजारावर पडताना दिसत आहेत. मोदी सरकारवर आणण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावाने गुंतवणूकदारांमध्ये विशेषतः परकी गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 2019 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 2018 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये निकाल सरकारच्या चिंतेत भर घालणारे आहेत. 

शिवाय जागतिक पातळीवर नवीन व्यापार धोरणांतर्गत अमेरिकेने पोलाद आणि अल्युमिनियमच्या आयातीवर अनुक्रमे 25 आणि 10 टक्के आयात कर लादला आहे. याला चीन, भारत आणि युरोपिअन समुदायाकडून विरोध वाढत असल्याने जागतिक व्यापार युद्धाचे सावट गडद होत चालले आहेत. तसेच पुढच्या आठवड्यात होऊ घातलेल्या अमेरिकेतील फेडरल बँकेच्या बैठकीमध्ये व्याजदर वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्याचा परिणाम रुपयावर होण्याची शक्यता आहे. व्याजदर वाढल्यास अमेरीकी डॉलरला अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे. परिणामी याचा फटका रुपयाला बसेल. गेल्या आठवड्यात प्रतिडॉलर 64.93 असलेला रुपया आज 65.10 वर पोचला आहे. व्याजदर वाढल्यास तो 65.30 वर पोचण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 
  
आज एएचडीएएफसी, आयसीआयसीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टाटा स्टील, एचसीएल टेक्नॉलॉजीस, बजाज फायनान्स सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चार टक्क्यांची घसरण झाली.     

Web Title: Sensex Falls Over 250 Points; Refiners, Metal Stocks Lose