उंच माझा झोका! न चुको काळजाचा ठोका!! 

उंच माझा झोका! न चुको काळजाचा ठोका!! 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या शुक्रवारी धडाकेबाज घोषणा केल्या आणि नेहमीच्याच निराश चेहऱ्याने शेअर बाजारात आलेल्या गुंतवणूकदारांना 440 व्होल्टचा झटका बसला. दहा वर्षांतील "न भूतो न भविष्यती' अशी तेजी एक दिवसात सर्वांना अनुभवता आली. आता मुख्य प्रश्न गुंतवणूकदारांनी नक्की काय करावे? 


 शेअर बाजारात गेल्या शुक्रवारी जबरदस्त तेजी येऊन, शेअर बाजार जवळजवळ 2000 अंशांनी उसळला. त्याची पूर्वपिठीका प्रथम! 


पाच जुलै रोजी आपला पहिला अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. अर्थव्यवस्था ढेपाळली होती, वाहन उद्योग उत्पादनकपात करीत होता आणि माध्यमे मंदीची चर्चा करीत होती. त्यावर अर्थसंकल्पात काही उपाय सुचवले जातील, असे वाटत होते. त्याऐवजी आला नवा कर! त्या निराशेतून परदेशी संस्थांनी शेअरविक्री सुरू केली आणि बाजार मंदीत गेला. घरबांधणी क्षेत्रासाठी स्वतंत्र पॅकेज, व्याजदरकपात, वाहनांच्या व्यवसायाला बळ, निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे धोरण अशा एक-एक घोषणा होत होत्या, पण शेअर बाजाराने व परकी गुंतवणूकदारांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. दिवाळीसाठी आणलेला प्रत्येकच फटाका फुसका निघावा आणि मग ध्वनी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून सुतळी बॉंब उडवावा, तसे अर्थमंत्र्यांनी शेवटी शुक्रवारी केले. या दिवशी नेहमीच्याच निराश चेहऱ्याने बाजारात आलेल्या गुंतवणूकदारांना 440 व्होल्टचा झटका बसेल, अशा नव्या सुधारणा अर्थमंत्र्यांनी केल्या आणि दहा वर्षांतील "न भूतो न भविष्यती' अशी तेजी एक दिवसात सर्वांना अनुभवता आली. बाजारात उत्साहाचे वारे संचारले आणि पाहता पाहता बॅंका, उद्योग बाजारातील प्रभूती, अर्थविश्‍लेषकांनी सरकारचे गोडवे गात या धोरणांबद्दल मुक्त कौतुकही केले. 


सरकारचा ताळेबंद पाहता, कॉर्पोरेट टॅक्‍स आणि जीएसटी घटवण्याचा निर्णय घेणे अत्यंत जड जाईल, असा कयास होता; पण अर्थमंत्र्यांनी अत्यंत धाडसीपणे हा निर्णय घेतला. कॉर्पोरेट कराचा दर 22 टक्‍क्‍यांवर आणणे, "मॅट' व भांडवलीकरातील सुधारणा, तसेच "एफपीआय'वरील जाचक कर मागे घेणे आदी घोषणांचे तपशील गेल्या दोन दिवसांत आपण सर्वांनी वाचलेच असतील. 

(गेल्याच रविवारच्या "सकाळ'च्या लेखात मी म्हटले होते, की अर्थव्यवस्थेचे रसायन चांगले जमून आले आहे. आता बाजाराची धारणा (सेंटीमेंट) बदलायला हवी. हे "सेंटीमेंट' बदलण्याचे महत्त्वाचे काम शुक्रवारी झाले. मागील लेखात असेही म्हटले होते, की 23 ऑगस्टचा 10,637 हा "निफ्टी'चा स्तर जर तोडला नाही, तर मार्केटला तळ सापडला आहे, असे म्हणता येईल.) 


या निर्णयामुळे, आपण चीन व पूर्वेकडील इतर देशांच्या करप्रणालीला टक्कर देऊ शकतो. व्यापारयुद्धामुळे व चीनचे रोजगार पूर्वीसारखे स्वस्त न राहिल्यामुळे, तेथून उद्योग व्हिएतनाम, सिंगापूर आदी देशात स्थलांतरित होत आहेत. ते आता भारतात येऊ शकतील. सुशिक्षित पण तरीही स्वस्त नोकरवर्ग, प्रचंड मोठी बाजारपेठ व नवीन प्रकल्पांना असलेला 15 टक्के कर यामुळे "मेक इन इंडिया' मोहिमेला प्रचंड चालना मिळेल. या ऐतिहासिक पावलांमुळे जगभरातून खासगी गुंतवणूक आपल्याकडे आकर्षित होऊ शकते. 

आथा थोडे भानावर येत बघूया. दोन वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अशीच करकपात अमेरिकेत केली होती. त्याचे काय झाले तेही पाहण्यासारखे आहे. एका तिमाहीत चार टक्‍क्‍यांची वाढ नोंदवून तेथील उत्साह संपला व त्यानंतरची मरगळ आजतागायत चालू आहे. व्याजदर वाढवता वाढवता फेडरल रिझर्व्हला दरकपात करावी लागली, हेही लक्षात घेतले पाहिजे. अर्थात, भारतीय बाजारपेठ वेगळी आहे. अमेरिकेचे किमान वेतन आजही आपल्या वीसपट आहे. तेव्हा ट्रम्प हे जरी नापास झाले असले, तरी आपले मोदी या परीक्षेत पास होऊ शकतात; तसेच कमी कराच्या प्रलोभनाने ते भारतात मोठी गुंतवणूक आणू शकतात. 


प्रश्‍न आहे तो म्हणजे, सरकारच्या ताज्या उपाययोजनांमुळे मागणी कशी आणि किती वाढेल?, सामान्य माणसाच्या हातात पैसा कशाप्रकारे खुळखुळेल? या चिंता सहजासहजी दूर होणाऱ्या नाहीत. त्यामुळे बाजार भानावर येऊन वर-खाली होईलच. पण दुसरीकडे अर्थव्यवस्था उघड्यावर टाकलेली नसून, सरकारचे त्याकडे पूर्ण लक्ष आहे, सरकारच्या योजना या केवळ दिवास्वप्न नाहीत, हा आत्मविश्वास सरकारने गुंतवणूकदारांना दिला आहे. अर्थमंत्री एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी त्याच दिवशी रात्री "जीएसटी'बाबतीतही धडाक्‍यात निर्णय घेऊन हॉटेल व्यवसायासाठी; तसेच हिऱ्यांचा पैलू पाडण्याच्या उद्योगात करसवलती देऊ केल्या. वाहन उद्योगालाही थोडासा दिलासा दिला आहे. हिरे व्यवसाय व हॉटेल व्यवसाय हे दोन्ही निर्यातपूरक असून, परकी चलनात उत्पन्न मिळवतात, हे लक्षात घेतले पाहिजे. 

आता मुख्य प्रश्न गुंतवणूकदारांनी नक्की काय करावे हा! मागचा लेख वाचून काही मोजके शेअर घेतले असतील तर शेअर बाजारात नफा मिळविण्याचा आनंद घेता येईल. एकटा "मारुती'चा शेअर 900 रुपयांनी वाढला आहे. अधूनमधून बाजाराच्या वरच्या पातळीवर नफा खिशात टाकण्याची सवय करायला हवी. 


मुख्य म्हणजे आज ना उद्या शेअर बाजार कोणत्या तरी तात्कालिक कारणांमुळे खाली येऊ शकतो. प्रत्येक खालच्या पातळीवर गुंतवणूक करण्याचे धैर्य आता दाखवायला हवे. कच्चे तेल अधूनमधून चढ-उतार दाखवतच असते. मुख्य म्हणजे महसुली तूट वाढली तर महागाई वाढण्याचा व रुपया स्वस्त होण्याचा धोका आहेच. "बाय ऑन डीप्स' हा यापुढील गुंतवणुकीचा मंत्र असावा. दरवर्षीच "निफ्टी'च्या 50 शेअरच्या उपार्जनाची (इपीएस) गणिते चुकतात. यावेळी "निफ्टी'च्या "ईपीएस'मध्ये 20 टक्के वाढ होण्याची शक्‍यता आहे व आजच्या पातळीपासून बाजार 10 टक्के वर जायला अजून वाव आहे. 
तेव्हा निराशा झटकून टाका. यापुढच्या प्रत्येक मंदीत संधी मानून गुंतवणुकीचा आनंद मिळवा, एवढाच सल्ला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com