शेअर बाजारात तेजीचे धूमशान! 

पीटीआय
Wednesday, 5 February 2020

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ९१७ अंशांनी उसळी घेऊन ४० हजार ७८९  अंशांवर स्थिरावला.

मुंबई - खनिज तेलाच्या भावात मोठी घसरण झाल्याने जगभरातील प्रमुख शेअर बाजारांमध्ये आलेल्या तेजीवर देशांतर्गत शेअर बाजार मंगळवारी स्वार झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ९१७ अंशांनी उसळी घेऊन ४० हजार ७८९  अंशांवर स्थिरावला. मागील तीन महिन्यांत सेनेक्‍सने एकाच दिवसात नोंदविले ही सर्वांत मोठी वाढ आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २७१ अंशांनी वधारून ११ हजार ९७९ अंशांवर बंद झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदी करत अर्थसंकल्पाच्या दिवशी झालेला तोटा काल (ता. ३) आणि आजच्या सत्रात मिळून भरून काढला. शनिवारी सेन्सेक्‍समध्ये ९८७ अंशांची घसरण झाली होती. त्यात सुधार होत काल सेन्सेक्‍सने १३६ अंशांनी वधारला होता. अर्थसंकल्पामुळे झालेले निराशाजनक वातावरण मागे टाकत गुंतवणूकदारांनी जागतिक पातळीवर होणाऱ्या घडामोडी आणि गुरुवारी जाहीर होणाऱ्या आरबीआयच्या पतधोरणावर लक्ष केंद्रित केले. त्याचबरोबर तिसऱ्या तिमाहीत येणारे देशांतर्गत कंपन्यांचे निकाल गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. खनिज तेलाच्या भावात घसरण झाल्याने देशांतर्गत कंपन्यांना, तसेच केंद्र सरकारला मोठा फायदा होईल, या अपेक्षेने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला आहे. आजच्या तेजीने शेअर बाजारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २ लाख कोटींची वाढ झाली आहे.

बेरोजगारांसाठी खुशखबर! पुण्यात मिळणार रोजगाराची संधी

तेलाच्या भावावर ‘कोरोना’ इफेक्‍ट 
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे प्रामुख्याने चीनमधील औद्योगिक उत्पादन मंदावले आहे. अनेक कंपन्यांनी त्यांचे उत्पादन काही दिवसांसाठी पूर्णपणे बंद केले आहे. कोरोना विषाणूमुळे येत्या काही काळात चीनमधील जनजीवन आणि पर्यायाने औद्योगिक उत्पादनावर परिणाम होऊन खनिज तेलाच्या मागणीत घसरण होईल, या अंदाजाने भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. जागतिक पातळीवर खनिज तेलाचा भाव ५ टक्‍क्‍यांची घसरण होऊन मागील १३ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोचला.

ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या तेजीत 
खनिज तेलाच्या भावात घसरण झाल्याने ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात वधारले. तसेच धातू, बॅंकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात मोठी वाढ नोंदविण्यात आली. सेन्सेक्‍सच्या मंचावर आज बजाज ऑटो आणि हिंदुस्थान युनिलिव्हर वगळता इतर २८ कंपन्यांचे समभाग मोठ्या तेजीसह बंद झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex index for Mumbai stock market