सेन्सेक्स व निफ्टीने आज सलग सातव्या दिवशी तोटा दाखविला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share

आज जागतिक वातावरण अनुकूल असूनही रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवेल या भीतीने फारशी जोरदार खरेदी झाली नाही.

सेन्सेक्स व निफ्टीने आज सलग सातव्या दिवशी तोटा दाखविला

मुंबई - रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक पतधोरण बैठकीकडे लक्ष लागून राहिलेल्या भारतीय शेअरबाजारांमध्ये आजही निरुत्साही वातावरण असल्याने आज सेन्सेक्स व निफ्टीने सलग सातव्या दिवशी तोटा दाखविला. सेन्सेक्स १८८.३२ अंश तर निफ्टी ४०.५० अंशांनी कोलमडला.

आज जागतिक वातावरण अनुकूल असूनही रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवेल या भीतीने फारशी जोरदार खरेदी झाली नाही. फक्त देशी वित्तसंस्था हळुहळू खरेदी करीत आहेत. अशातच आज सकाळी व्यवहार सुरु होताना बाजार नफ्यात होते. सेन्सेक्स ५७,१६६.१४ अंशांवर गेला होता. मात्र नंतर विक्रीच्या मारा आल्यावर बाजाराने सर्व नफा घालवून टाकला. दिवसअखेर सेन्सेक्स ५६,४०९.९६ अंशांवर तर निफ्टी १६,८१८.१० अंशांवर स्थिरावला.

व्यवहाराच्या गेल्या १२ दिवसांपैकी नऊ दिवस शेअरबाजारांनी तोटा दाखविला आहे. १३ सप्टेंबरपासून सेन्सेक्स व निफ्टी सुमारे सहा टक्के कोसळले असून सेन्सेक्स ३,७६५ अंशांनी तर निफ्टी १,१३६ अंशांनी पडला आहे. गेल्या सात दिवसांत परदेशी वित्तसंस्था विक्री करत असताना देशी वित्तसंस्थांनी मात्र दहा हजार कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.

आज निफ्टीच्या प्रमुख शेअरपैकी एशियन पेंट सव्वापाच टक्के कोसळला तर टेक महिंद्र, हिरो मोटरकॉर्प, बजाज ऑटो, टायटन हे शेअर सुमारे एक टक्का पडले. तर दुसरीकडे आयटीसी अडीच टक्के वाढला आणि ओएनजीसी, अपोलो हॉस्पीटल, हिंदाल्को, एचडीएफसी लाईफ या शेअरचे भाव अंदाजे एक टक्का वाढले.

टॅग्स :NiftyDecreasesensex