सेन्सेक्‍स, निफ्टी सुसाऽऽट

Sensex
Sensex

मुंबई - जागतिक बाजारातील तेजी आणि वायदेपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने गुरुवारी (ता. २९) शेअर बाजारात तेजीची लाट आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ४५३ अंशांची उसळी घेत ३६ हजार १७० वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत १२९.८५ अंशांची वाढ झाली आणि तो १० हजार ८५८.७० अंशांवर स्थिरावला. या तेजीने गुंतवणूकदारांना जवळपास दीड लाख कोटींनी मालामाल केले.

अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्याजदरवाढीबद्दल संयमाची भूमिका घेतली आहे. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदर सरासरीच्या कमीच राहतील, असे संकेत दिले. या वक्‍तव्यानंतर जागतिक शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. ‘जी-२०’ परिषदेत अमेरिका-चीन व्यापारी संघर्ष व इतर प्रमुख मुद्यांवर तोडग्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. खनिज तेल दरातील घसरण रुपयाच्या पथ्यावर पडली. या सर्व घडामोडी बाजारात तेजी वृद्धिंगत करण्यास फायदेशीर ठरल्याचे शेअर दलालांनी सांगितले. बुधवारी (ता. २८) परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ९६१.२६ कोटींची खरेदी केली. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मात्र ३३०.२९ कोटींचे शेअर्स विक्री केले.

महिंद्रा अँड महिंद्रा, वेदांता, इंडसइंड बॅंक, बजाज ऑटो, कोटक महिंद्रा, एशियन पेंट्‌स, एचडीएफसी बॅंक, रिलायन्स, एचयूएल, एचडीएफसी, आयटीसी, 
टाटा स्टील आणि टाटा मोटार आदी शेअर पाच टक्‍क्‍यांपर्यंत वधारले. मात्र ओएनजीसी, पावरग्रीड, एनटीपीसी, इन्फोसिस, येस बॅंक, सन फार्मा आदी शेअरमध्ये घसरण झाली.

तेजीची कारणे
    फेडरल रिझर्व्हचा व्याजदराबाबत दिलासा
    चलन बाजारात रुपया वधारला
    कच्च्या तेलाच्या भावात घसरण
    जी-२० देशांची परिषदेकडे लक्ष

रिलायन्स इंडस्ट्रीज अव्वल 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये आज दोन टक्‍क्‍यांनी वाढ होत तो १ हजार १७० रुपयांवर बंद झाला. रिलायन्सने पुन्हा एकदा सर्वाधिक बाजार भांडवल असलेली कंपनीचा मान मिळवला. रिलायन्सचे बाजार भांडवल ७ लाख ४१ हजार ६१६.२० कोटी आहे. ‘टीसीएस‘ला पुन्हा मागे टाकत रिलायन्स अव्वल स्थानावर पोचली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com