तब्बल 5.66 लाख कोटी रुपयांचा चुराडा 

तब्बल 5.66 लाख कोटी रुपयांचा चुराडा 

मुंबई - बिगर बॅंकिंग वित्त कंपन्यांच्या (एनबीएफसी) शेअर्समध्ये तुफान विक्रीमुळे शुक्रवारी (ता.21) दुपारच्या सत्रात सेन्सेक्‍स 1 हजार 127.58 अंशांनी कोसळला. सेन्सेक्‍सचे हजार अंशांच्या आपटीने गुंतवणूकदारांची अक्षरश: गाळण उडाली. अवघ्या काही मिनिटांत एकाएकी घडलेल्या या घसरण नाट्याने ब्रोकर्स, म्युच्युअल फंड मॅनेजर, गुंतवणूक सल्लागार यांच्यासह लाखो गुंतवणूकदारांचा काळजाचा ठोका चुकवला. दिवसअखेर मात्र सेन्सेक्‍स 279.62 अंशांच्या घसरणीसह 36 हजार 841 अंशांवर स्थिरावला. निफ्टीमध्ये 91.25 अंशांची घट झाली आणि तो 11 हजार 143 अंशांवर बंद झाला. 

फक्त चार सत्रांतच दलाल स्ट्रीटवरच्या शेअर बाजाराने गटांगळ्या खात गुंतवणूकदारांना 5 लाख 66 हजार 187 कोटी रुपयांचा दणका दिला आहे. फक्त शुक्रवारच्या एका दिवसातच मुंबई शेअर बाजारात नोंदणी केलेल्या कंपन्यांचे भागभांडवल तब्बल 2 लाख 2 हजार 433 कोटी रुपयांनी कमी झाले. यादरम्यान "बीएसई'मधील 30 शेअरमध्ये सुधारणा होत त्यांनी आपले भागभांडवल बऱ्याचशा प्रमाणात परत मिळवले. फक्त 13 शेअरनाच या पडझडीमध्ये लाभ मिळवता आला. निफ्टीतील 50 शेअरपैकी 23 शेअर सावरले, तर 27 शेअरना या घसरणीचा दणका बसला. फायनान्शियल, बॅंक, फार्मा आणि रियल्टी क्षेत्रातील शेअरच्या किमतीतील पडझडीमुळे मुंबई शेअर बाजारातील नोंदणी झालेल्या कंपन्यांचे एकूण भागभांडवल 1,56,37,019.15 कोटी रुपयांवरून 1,50,70,832.18 कोटी रुपयांवर पोचले आहे. 

टॉप लूजर (%) 
येस बॅंक -28.71 
कोटक बॅंक -3.86 
टाटा मोटर्स डीव्हीआर -3.68 
अदानी पोर्टस -2.94 
इंडसइंड बॅंक -2.38 


टॉप गेनर्स (%) 
ओएनजीसी 1.95 
विप्रो 1.38 
आयटीसी 1.37 
टीसीएस 1.30 
एशियन पेंट्‌स 1.07 

नेमकं काय घडलं 
सकाळच्या सत्रात सेन्सेक्‍सने तेजीसह सुरुवात केली होती. दुपारपर्यंत बाजारात सर्वकाही आलबेल होते, मात्र याच दरम्यान "डीएचएफएल' ही कंपनी आर्थिक संकटात सापडल्याचे वृत्त धडकले आणि गुंतवणूकदारांनी तुफान विक्रीला सुरुवात केली. सोबत आयएलअँडएफएस आणि येस बॅंकेच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. यामुळे तेजीतील सेन्सेक्‍स काही सेकंदांत कोसळला. चहूबाजूने विक्रीचा सपाटा सुरू झाला आणि बघता बघता सेन्सेक्‍सने थेट एक हजार अंशांची डुबकी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी 368 अंशांनी कोसळला. बिगर बॅंकिंग वित्त कंपन्यांसंदर्भात अफवांनी बाजाराचा ताबा घेतला. किरकोळ गुंतवणूकदार धास्तावले. मात्र, त्यानंतर पुन्हा खरेदीचा जोर वाढला आणि सेन्सेक्‍सने जवळपास 750 अंशांची उभारी घेतली. 

रुपयाची घोडदौड 
चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाने दमदार कामगिरी केली. दिवसअखेर रुपया डॉलरच्या तुलनेत 17 पैशांनी वधारून 72.20 च्या पातळीवर बंद झाला. 

"एनबीएफसी' कंपन्यांसंदर्भातील वृत्ताने बाजारात भीतीचे वातावरण झाले. डीएचएफएल, येस बॅंक, इंडियाबुल्स हौसिंग फायनान्स आदी शेअरमध्ये प्रचंड विक्री दिसून आली. बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीने निर्देशांक कोसळला. 
- विनय खट्टर, प्रमुख संशोधक, एडलवाईज इन्व्हेस्टमेंट रिसर्च 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com