शेअर बाजारात पुन्हा तेजीचे वारे

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 एप्रिल 2018

जागतिक बाजारातून मिळणारे सकारात्मक संकेत आणि रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली.

मुंबई: जागतिक बाजारातून मिळणारे सकारात्मक संकेत आणि रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. आरबीआयने रेपो दर 6 टक्‍क्‍यांवर तर रिव्हर्स रेपो दर देखील 5.75 टक्क्यांवर कायम ठेवला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 577.73 अंशांनी वधारून 33 हजार 596.80 अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 196.75 अंशांची वाढ झाली. निफ्टी 10 हजार 325.15 पातळीवर व्यवहार करत स्थिरावला. 

निफ्टीने आज 10 हजार 300 अंशांची महत्त्वपूर्ण पातळी गाठली. तर सेन्सेक्सने 33 हजार 600 अंशांची पातळी गाठली. शेअर बाजारात आज गुंतवणूकदरांमध्ये खरेदीचा उत्साह होता. क्षेत्रीय पातळीवर ऑटो, मेटल, रिअल्टी, कॅपिटल गुड्स आणि ऑईल अँड गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी झाली. बँक निफ्टी 2.6 टक्क्यांच्या वाढीसह 24,760 पातळीवर बंद झाला. निफ्टी मेटल निर्देशांक 4 टक्क्यांनी वधारला होता. 

आज मुंबई शेअर बाजारात हिंडाल्को, वेदांता, एसबीआय, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स डीव्हीआर, इंडियाबुल्स हौसिंग, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांचे शेअर्स प्रत्येकी 3.4 ते 6.6 टक्क्यांनी वधारले होते. मात्र आज सिप्ला (1.7 टक्के) आणि भारती एअरटेलच्या (0.3 टक्के) शेअर्समध्ये घसरण झाली. 

 

Web Title: Sensex Surges Over 550 Points After RBI Cuts Inflation Forecast