शेअर बाजारात तेजीचा ‘वारू’ 

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याने शेअर बाजारात काल तेजीचा ‘वारू’ चौखूर उधळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५५० अंशांची उसळी घेऊन ३४ हजार ४४२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १८८ अंशांनी वधारून १० हजार ३८६ अंशांवर बंद झाला. 

केंद्र सरकारने आज रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता आवश्‍यक असल्याचे स्पष्ट केले. याचबरोबर सार्वजनिक हित आणि अर्थव्यवस्थेची गरज पाहून तिला दिशा देण्याची आवश्‍यकता असल्याचे सूतोवात अर्थ मंत्रालयाने केले. यामुळे केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यातील वाद मिटण्याची चिन्हे निर्माण झाली. या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारात आज तेजीचे वारे निर्माण झाले. 

बॅंकिंग, माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माण आणि बांधकाम या क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभागात आज मोठी वाढ झाली. एचडीएफसीच्या समभागात आज सर्वाधिक ६ टक्के वाढ झाली. त्याखालोखाल ॲक्‍सिस बॅंक, येस बॅंक, एसबीआय आणि आयसीआयसीआय बॅंकेच्या समभागात ४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली.

डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाल्याने माहिती तंत्रज्ञान आणि औषधनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना फायदा झाला. अमेरिका आणि विकसनशील देशांतील शेअर बाजारांमध्ये पुन्हा तेजीचे वारे आले असून, घसरणीचे वारे थांबले आहे, असे शेअर बाजारातील दलालांनी सांगितले. 

आशियाई बाजारांमध्ये वाढ (आकडे टक्‍क्‍यांमध्ये)  
शांघाय कम्पोझिट - १.३५ 
हॅंगसेंग - १.६० 
निक्केई - २.१६ 
सेन्सेक्‍स - १.६३ 
निफ्टी - १.८५

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex zooms 550 points