"सेन्सेक्‍स'ची ऐतिहासिक उच्चांकाला गवसणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

सकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने गुरुवारी (ता. 31) भांडवली बाजाराच्या सेन्सेक्‍सने 293 अंशांच्या वाढीसह 40 हजार 399 अंशांच्या ऐतिहासिक उच्चांकाला स्पर्श केला.

मुंबई : सकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने गुरुवारी (ता. 31) भांडवली बाजाराच्या सेन्सेक्‍सने 293 अंशांच्या वाढीसह 40 हजार 399 अंशांच्या ऐतिहासिक उच्चांकाला स्पर्श केला.

दिवसअखेर तो 77.18 अंशांच्या वाढीसह 40 हजार 129.05 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 33.35 अंशांची वृद्धी झाली आणि तो 11 हजार 877.45 अंशावर स्थिरावला. सेन्सेक्‍स आणि निफ्टीत सलग पाचव्या सत्रात वाढ झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. 

अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. कर कपातीच्या शक्‍यतेने गुंतवणूकदारांच्या अपेक्षा उंचावल्या असल्याचे शेअर दलालांनी सांगितले. आजच्या सत्रात एसबीआय, इन्फोसिस, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, एचसीएल टेक, एचडीएफसी आदी शेअर सात टक्‍क्‍यांनी वधारले. टेक महिंद्रा, ऍक्‍सिस बॅंक, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा आणि आयसीआयसीआय बॅंकेच्या शेअरमध्ये दोन टक्‍क्‍यांची घसरण झाली. बीएसई टेक, टेलिकॉम, आयटी, रियल्टी, हेल्थकेअर निर्देशांकात वाढ दिसून आली. शेअर बाजाराच्या माहितीनुसार बुधवारी (ता. 30) परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारात सात हजार 192 कोटींची गुंतवणूक केली. 

कॉर्पोरेट्‌सचे तिमाही निकाल, सरकारच्या आर्थिक सुधारणांनी भांडवली बाजारातील गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. यामुळे परकीय गुंतवणूकदारांचा उदयोन्मुख बाजारांवरील दृष्टिकोन सकारात्मक बनला आहे. 
- विनोद नायर, विश्‍लेषक, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस 

येस बॅंकेच्या शेअरमध्ये 24 टक्‍क्‍यांची वृद्धी 

खासगी क्षेत्रातील येस बॅंकेच्या शेअरने आज 24.03 टक्‍क्‍यांची उसळी घेतली. बॅंकेला परकीय गुंतवणूकदारांकडून आठ हजार 500 कोटींची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रोकडटंचाईचा सामना करणाऱ्या येस बॅंकेला संजीवनी मिळणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज गुंतवणूकदरांनी बॅंकेच्या शेअरची तुफान खरेदी केली. 

जगभरात तेजीची लाट 

जागतिक पातळीवरील प्रमुख भांडवली बाजारात तेजीची लाट दिसून आली. फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात केल्याने जागतिक बाजारांमध्ये तेजीचे वातावरण आहे. हॉंगकॉंग, सेऊल, टोकियो आदी भांडवली बाजार तेजीसह बंद झाले; मात्र शांघाई बाजारात घसरण झाली. 

web title : Sensex's touches at high


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex's touches at high