share bazar scholar batch
share bazar scholar batch

पैशाच्या गोष्टी: शेअर बाजारातील ‘स्कॉलर बॅच’!

मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक- 'सेन्सेक्‍स' आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील निर्देशांक- 'निफ्टी' हे दोन निर्देशांक शेअर बाजारातील बहुतेक सर्व गुंतवणूकदारांना माहीत असतात. परंतु म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून या निर्देशांकामध्ये गुंतवणूक करता येते, हे थोड्या गुंतवणूकदारांना माहीत असते. अशा फंडांना 'इंडेक्‍स फंड' म्हणतात. उदाहरणार्थ, 'सेन्सेक्‍स'वर आधारित फंडामध्ये गुंतवणूक केल्यास 'सेन्सेक्‍स'मध्ये समाविष्ट असलेल्या 30 कंपन्यांच्या शेअरमध्ये अप्रत्यक्षपणे गुंतवणूक होऊन 'सेन्सेक्‍स'एवढाच परतावा मिळू शकतो.

सेन्सेक्‍स आणि निफ्टी यांमधील अनुक्रमे 30 आणि 50 कंपन्या आपापल्या क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्या असतात आणि ठराविक कालावधीनंतर या कंपन्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन एखादी कंपनी वगळली जाते आणि एखाद्या नव्या कंपनीचा समावेश होतो. त्यामुळे शाळेतील परिभाषेत सांगायचे झाले, तर 'सेन्सेक्‍स' आणि 'निफ्टी' ही शेअर बाजारातील 'स्कॉलर बॅच' आहे. इंडेक्‍स फंडांच्या माध्यमातून या 'स्कॉलर बॅच'मध्ये नियमित गुंतवणूक केल्यास भारतीय शेअर बाजारातील अत्यंत निवडक कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्याचे फायदे मिळतात. शिवाय ठरवून दिलेल्या शेअरमध्येच गुंतवणूक झाल्यामुळे फंड मॅनेजरच्या शेअर निवडीच्या चुका या फंडात होत नाहीत. तसेच इतर फंडांच्या तुलनेत या फंडांचे खर्चदेखील कमी असतात. शेअर बाजारातील बहुतेक सर्व क्षेत्रामध्ये इंडेक्‍स फंडाची गुंतवणूक असल्याने डायव्हर्सिफाइड फंडाचे फायदे आणि स्थैर्य अशा फंडांना मिळते. शेअर बाजारात नव्याने प्रवेश करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी; तसेच निर्देशांकाएवढा परतावा मिळविण्यासाठी 'इंडेक्‍स फंड' योग्य ठरतात. आपली इतर सर्व गुंतवणूक जोखीमयुक्त पर्यायांमध्ये गुंतलेली असेल तर थोडी रक्कम कमी जोखीम असलेल्या इंडेक्‍स फंडात नियमितपणे गुंतवणे इष्ट ठरते. 'सेन्सेक्‍स' आणि 'निफ्टी'मधील चढ-उतारांचा फायदा घेण्यासाठी 'एसआयपी'चा मार्ग निवडल्यास चांगला परतावा मिळतो. उदाहरणार्थ, युटीआय निफ्टी इंडेक्‍स फंडाने 2002 ते 2016 या पंधरा वर्षांच्या कालावधीत 'एसआयपी' गुंतवणुकीवर जवळजवळ 13 टक्के करमुक्त वार्षिक परतावा दिलेला आहे. अर्थात गुंतवणुकीपूर्वी इंडेक्‍स फंडाच्या मर्यादादेखील लक्षात घ्याव्यात. एक तर शेअर बाजारातील हजारो कंपन्यांपैकी अगदी थोड्या कंपन्यांच्या शेअरमध्ये असे फंड गुंतवणूक करतात. अशा वेळी अतिशय चांगली कामगिरी करणाऱ्या; परंतु निर्देशांकात समाविष्ट नसलेल्या कंपन्यांकडे इंडेक्‍स फंड मॅनेजरला दुर्लक्ष करावे लागते आणि त्याच वेळी निर्देशांकातील कमी वेगाने धावणाऱ्या कंपनीमध्ये मात्र गुंतवणूक करावीच लागते. या सर्वांचा परिणाम इंडेक्‍स फंडांच्या कामगिरीवर होऊ शकतो. असे असले तरी दीर्घकाळासाठी एखादा इंडेक्‍स फंड आपल्याकडे असावा.

काही इंडेक्‍स फंडांची नावे पुढीलप्रमाणे: आयडीएफसी निफ्टी फंड, फ्रॅंकलिन इंडिया इंडेक्‍स फंड, एसबीआय निफ्टी इंडेक्‍स फंड, रिलायन्स इंडेक्‍स फंड, यूटीआय निफ्टी इंडेक्‍स फंड. काही म्युच्यअल फंड कंपन्यांनी सेन्सेक्‍स आणि निफ्टीबरोबरच इतर निर्देशांकावर आधारित फंडदेखील बाजारात उपलब्ध केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com