शेअर बाजारात तेजी परतली

पीटीआय
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

मुंबई - शेअर बाजारात सुरू असलेली घसरणीची लाट अखेर मंगळवारी ओसरून तेजी परतली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३४७ अंशांची उसळी घेऊन ३६ हजार ६५२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १०० अंशांची वाढ होऊन ११ हजार ६७ अंशांवर बंद झाला. 

मुंबई - शेअर बाजारात सुरू असलेली घसरणीची लाट अखेर मंगळवारी ओसरून तेजी परतली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३४७ अंशांची उसळी घेऊन ३६ हजार ६५२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १०० अंशांची वाढ होऊन ११ हजार ६७ अंशांवर बंद झाला. 

शेअर बाजारात मागील सलग पाच सत्रांत घसरणीचे वारे होते. मागील पाच सत्रांत सेन्सेक्‍समध्ये १ हजार ७८५ अंशांची घसरण नोंदविण्यात आली होती. आज अखेर पुन्हा बाजारात तेजी निर्माण झाली. गुंतवणूकदारांकडून मागील काही दिवस सुरू असलेला विक्रीचा मारा थांबला आणि खरेदीचा जोर सुरू झाला. औषधनिर्माण, बॅंकिंग आणि एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात आज मोठी वाढ नोंदविण्यात आली. 

सेन्सेक्‍समध्ये आज दिवसभरात मोठे चढउतार पाहायला मिळाले. अखेर सेन्सेक्‍स ३४७ अंशांची वाढ होऊन ३६ हजार ६५२ अंशांवर बंद झाला. दरम्यान, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काल (ता. २४) १ हजार ५२७ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले तर, परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ५२३ कोटी रुपयांचे समभाग विकले.

जागतिक अर्थव्यवस्था चिंताजनक 
आशियाई शेअर बाजारांतील संमिश्र वातावरण आणि युरोपीय शेअर बाजारांमध्ये झालेली वाढ यामुळे देशांतर्गत शेअर बाजारात उत्साह निर्माण झाला. आज निर्देशांकामध्ये मोठे चढउतार तसेच, ठरावीक समभागांची खरेदी-विक्री यावर जोर राहिला. जागतिक पातळीवर विचार करता खनिज तेल सुमारे चार वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोचले आहे. याचबरोबर अमेरिका-चीन व्यापारयुद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती शेअर बाजार विश्‍लेषकांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share Market Increase