‘डर के आगे जीत है’ 

‘डर के आगे जीत है’ 

मागील काही लेखांमधून शेअर बाजारातील नफेखोरीची शक्‍यता अधोरेखित केली होती व त्याच वेळेस शेअर खरेदीची यादीपण तयार ठेवायला सुचविले होते. त्याच अनुषंगाने आज सातत्याने बाजार कोसळत असताना, ‘मंदी हीच संधी’ या उक्तीप्रमाणे बाजारातील गोंधळाकडे दुर्लक्ष करून, थोडे धैर्य दाखवायला हवे आणि या सुवर्णसंधीचा फायदा घेतला पाहिजे; पण गुंतवणुकीचा कालावधी कमीत कमीत तीन वर्षे असेल तरच शेअर बाजारात यावे, केवळ सट्टा करण्यासाठी नव्हे. 

अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल, फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढण्याची भीती आणि आपल्याकडे ५०० व १००० च्या नोटांवरील बंदीने बाजारात अनिश्‍चितेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घडामोडींमुळे बाजारातील पडझडीला बळ मिळाले आहे. ही पडझड, भीती बाजारात अजून काही काळ राहू शकेल, असे वाटते; परंतु आम्ही नेहमी सांगतो त्याप्रमाणे, ‘मंदी हीच खरेदीची उत्तम संधी असते.’ शेवटी, ‘डर के आगे जीत है,’ हे विसरू नका. बाजारात नव्याने गुंतवणूक करायला हा काळ चांगला असून, सध्याच्या तत्कालीन कारणांमुळे निर्माण झालेल्या भीतीमय वातावरणाला घाबरून न जाता किमान तीन वर्षांचा दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करायला हवी; कारण अशी संधी बाजारात खूप कमी वेळा मिळते. या पडझडीत खूप चांगले शेअर त्यांच्या अलीकडच्या उच्चांकी भावापासून बरेच खाली आले आहेत. त्यातील उत्तम शेअर जरूर निवडा. आपली गुंतवणुकीची उद्दिष्टे स्पष्ट असावीत. त्यानुसार, शेअर बाजारात अधूनमधून नफा हा घरात आणला पाहिजे. अल्पावधीत चांगला नफा मिळाला, तर तो निश्‍चितच घरात घेतला पाहिजे. 

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आणि अभ्यासासाठी आम्ही दोन शेअर आपल्याला सुचवत आहोत. 

१) उज्जीवन फायनान्शिअल सर्व्हिसेस लि. 
(सध्याचा भाव - रु. ३५०, गुंतवणूक कालावधी - २४-३६ महिने) 
उज्जीवन फायनान्शियल ही भारतातील क्रमांक एकची "एनबीएफसी' असून, सध्या बाजारात चालू असलेल्या घसरणीत तिचा शेअर आकर्षक भावावर उपलब्ध आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. ५०० आणि १००० च्या नोटाबंदीचा प्रभाव शेअर भावावर झाला असून, कदाचित अजून काही काळ तो राहील, असे वाटते. जुलै महिन्यात या शेअरने रु. ५४० ची भावपातळी ओलांडली होती व तेथून जवळजवळ ३५ टक्के इतका भाव खाली आला आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये कंपनी रु. २४ व वर्ष २०१७-१८ मध्ये रु. ३२ चा ‘ईपीएस’ दाखविणे अपेक्षित आहे. या क्षेत्रातील इतर कंपन्यांचे ‘पीई’ गुणोत्तर बघता ‘उज्जीवन’ला १६-१८  चे ‘पीई’ गुणोत्तर मिळण्यास हरकत नाही. कंपनीचे बुडीत कर्जाचे प्रमाण हे नियंत्रित असून, ५०० व १००० च्या नोटांवरील बंदीमुळे कर्जवसुलीवर होणारा परिणाम हा तात्पुरता असेल, असे वाटते. 

२) श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स कंपनी लि.

(सध्याचा भाव - रु. ८३५, गुंतवणूक कालावधी - २४-३६ महिने) 
श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स या कंपनीला ३० वर्षांचा इतिहास असून ही कंपनी लहान, मध्यम उद्योजकांना वाहन व बांधकाम साहित्यासाठी कर्जपुरवठा करते. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये कंपनी रु. ६५ आणि वर्ष २०१७-१८ मध्ये रु. ८०-८५ चा ‘ईपीएस’ दाखविणे अपेक्षित आहे. लार्ज कॅप या श्रेणीत ही कंपनी येत असून, तिलाही १८ चे ‘पीई’ गुणोत्तर मिळायला हवे. परदेशी आणि भारतीय वित्तीय संस्थांची या शेअरमध्ये बऱ्यापैकी गुंतवणूक आहे. 

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी या शेअरचा नक्की विचार करावा. अर्थातच, आपापल्या पातळीवर व्यवस्थित अभ्यास करूनच! 

(डिस्क्‍लेमर - लेखकद्वय इक्विबुल्सचे संचालक आहेत. वरील लेखातील मत आणि अंदाज त्यांनी त्यांच्या अभ्यासातून व्यक्त केले आहेत. त्याच्याशी "सकाळ' सहमत असेलच असे नाही. वाचकांनी शेअर खरेदी-विक्रीचे निर्णय आपापल्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com